comedian Praneet More in Solapur : अभिनेता वीर पहारियावर केलेल्या (Actor Veer Paharia) विनोदामुळे चिडून स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे (Standup comedian Praneet More) याला दहा-बारा जणांनी मारहाण केली. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी सात रस्ता येथील 24 के क्राफ्ट ब्रिव्हज रेस्टॉरंट येथे घडली. याप्रकरणी तन्वीर शेखसह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात लक्ष्मण मोहन झेंडे (वय 33, रा. जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेस्टारंट येथे 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रणित मोरे यांचा कॉमेडी शो होता. कार्यक्रम झाल्यावर तेथील कॉमेडीचा राग मनात धरुन दहा ते बारा जणांनी मारहाण केली. या प्रकरणी फौजदार पाटील तपास करत आहेत. दरम्यान, अभिनेता पहाडिया याने समाज माध्यमांवर घटनेविषयी पोस्ट प्रसिद्ध केली आहे. घटनेविषयी त्यास दुःख वाटत असून याच्याशी माझा संबंध नाही. याचा निषेधच केला पाहिजे. अशा गोष्टींना मी थारा देत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पहाडिया यांचा पहिलावहिला सिनेमा 'स्काय फोर्स' 24 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. त्यात पहाडियाने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.
प्रणित मोरे काय म्हणाला होता?
सध्या सोशल मीडियावर स्काय फोर्स या चित्रपटापेक्षा वीर पहारियाची चर्चा जास्त आहे. जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू ही त्याची ओळख. राजकीय कुटुंबातील असल्याने त्याला अभिनय येणार हे नक्की. या चित्रपटात वीर पहारिया आणि अक्षय कुमार एअरफोर्सचे अधिकारी दाखवले आहेत. ते पाकिस्तानात भटकतात. वीर पहारियाने चित्रपटात इतकं वाईट काम केलं की पहिल्यांदा पाकिस्तानी भारतीयांना म्हणतात की, याला ठेवून घ्या. बजरंगी भाईजानही म्हणतोय की, मी याला पाकिस्तानात सोडून येईनच.
नक्की वाचा - Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण
मारहाण का झाली?
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्यावर वीर पहारिया याच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट स्काय फोर्स चित्रपटातून वीरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वीर पहारिया याच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोलापुरात त्याला मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे सोलापुरात पोलीस ठाण्यात प्रणित तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता, मात्र त्यावेळी त्याची तक्रार दाखल करून घेतली नव्हती. दरम्यान या प्रकरणात तन्वीर शेखसह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
वीर पहारिया कोण आहे? काय आहे सोलापूर कनेक्शन?
अक्षय कुमार स्टारर स्काय फोर्स हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीर पहारियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर वीर पहारियाची मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खान आल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या रिलेशनशीपविषयी काही खुलासे केले. त्यांनी ज्या दोन भावांसोबत रिलेशनशीप असल्याचा उल्लेख केला होता, त्यातील एक वीर पहारिया आहे. वीर पहारिया हा सारा अली खानला डेट करीत असल्याच्याही चर्चा होत्या. दरम्यान त्याचं सोलापूर कनेक्शन म्हणजे तो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुशीलकुमार यांचा नातू आहे. सोलापुरात सुशीलकुमार यांचं मोठं नाव आहे. मूळचे सोलापूरचे असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी 2023 साली राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.