Viral News: चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर आवडत्या सुपरहिरोचा चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र, जर कोणी चित्रपटाचा सस्पेन्स आधीच सांगून संपूर्ण मजा घालवत असेल, तर प्रेक्षकांचा पारा चढणे साहजिक आहे. असाच एक भयंकर आणि तितकाच विचित्र प्रकार 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' या नव्याने प्रदर्शित झालेल्या मार्व्हल (Marvel) चित्रपटाच्या शोदरम्यान घडला आहे.
चित्रपटातील पुढे काय घडणार हे मोठ्या आवाजात सांगणाऱ्या एका तरुणाला शेजारी बसलेल्या चार मित्रांनी चित्रपटगृहातच बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर तुफान व्हायरल झाला आहे.
नेमकी काय घडली घटना?
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, चार मित्र अत्यंत उत्साहाने टॉम हॉलंडचा नवीन मार्व्हल चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. त्यांच्या शेजारीच एक तरुण आपल्या महिला मैत्रिणीसोबत बसला होता. तो तरुण हा चित्रपट आधीच एकदा पाहून आला होता आणि दुसऱ्यांदा तो आपल्या मैत्रिणीसोबत आला होता. चित्रपट सुरू असताना तो तरुण पुढच्या दृश्यात काय घडणार आहे, कोणता सस्पेन्स समोर येणार आहे, हे सतत मोठ्या आवाजात आपल्या मैत्रिणीला सांगत होता. शेजारी बसलेल्या चार मित्रांचा यामुळे प्रचंड रसभंग होत होता. त्यांनी सुरुवातीला त्या तरुणाला शांत राहण्याची विनंती केली.
भांडणाचे रूपांतर तुफान मारामारीत
वारंवार सांगूनही तो तरुण ऐकत नसल्याने आणि सतत 'स्पॉयलर' देणे सुरूच ठेवल्यामुळे शेजारी बसलेल्या मित्रांचा संयम सुटला. त्यांच्यात आधी शाब्दिक चकमक झाली. मात्र, पाहता पाहता या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत आणि मारामारीत झाले.
चित्रपटगृहात अंधारातच त्या चार मित्रांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संपूर्ण थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. व्हायरल व्हिडिओमध्ये भरलेल्या प्रेक्षागृहात लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना तर काही जण या गोंधळाचा व्हिडिओ बनवताना दिसले.
डेस्टिन डॅनियल क्रेटन दिग्दर्शित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' या चित्रपटात टॉम हॉलंड, झेंडाया, जेकब बेटालोन, मार्क रुफालो, जॉन बर्न्थल आणि साडी सिंक यांच्या मुख्य भूमिका आहेत. टॉम हॉलंडचा मार्व्हल युनिव्हर्समधील हा चौथा स्वतंत्र स्पायडर-मॅन चित्रपट आहे.