- डॉ.प्रतिमा थमके, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॅास्पिटल, खारघर, नवी मुंबई
Twinkle Khanna Shares Her Menopause Struggles: अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna News) अभिनयाव्यतिरिक्त थेट आणि स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठीही ओळखली जाते. महिलांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांसह समस्यांवर परखडपणे बोलण्यासही ती मागेपुढे पाहत नाही. अलिकडेच ट्विंकलने महिलांच्या जीवनातील मेनोपॉज या टप्प्याबाबत उघडपणे भाष्य केलं. स्वतः ट्विंकल या समस्येचा सामना करतेय. रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे नेमके काय? या समस्येची लक्षणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया...
मेनोपॉज म्हणजे काय? | What Is Menopause?
रजोनिवृत्ती (Rajonivrutti Mhanje Kay) अथवा मेनोपॉज (Menopause Mhanje Kay) ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. साधारणतः 40 ते 50 या वयामध्ये महिलांना या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. महिलांसाठी रजोनिवृत्तीचा टप्पा आव्हानात्मक ठरतो. शिवाय शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तीमुळे महिलेच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम पाहायला मिळतात. हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम महिलांच्या भावनिक आणि शारीरीक आरोग्यावर होतो.
मेनोपॉजची लक्षणे | Menopause Symptoms
मेनोपॉज काळात महिलांना अनियमित मासिक पाळी येणे, गुप्तांगाची जागा कोरडी होणे, हॉट फ्लॅशेस म्हणजे शरीरात उष्णता वाढणे, रात्री झोपेत असताना घाम येणे, शांत झोप न लागणे, सतत मूड बदलणे, वजन वाढणे, चयापचयाची गती मंदावणे, केसगळती, हृदयाचे ठोके अनियमित होणे, डोकेदुखी, चिडचिड होणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वच महिलांमध्ये रजोनिवृत्तीची एकसारखीच लक्षणे आढळत नाहीत, हे देखील लक्षात घ्यावे. काही महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान मूड बदलणे किंवा हॅाट फ्लॅश यासारखी लक्षणे आढळतात, या समस्येची तीव्रता बदलू शकते. तर काही महिलामंध्ये ही लक्षणं मुळीच आढळत नाही.
मूड बदलामुळे वैयक्तिक जीवनावर दुष्परिणाम
मेनोपॉज काळादरम्यान महिलांचे मूड मोठ्या प्रमाणात बदलत राहतात. एखादी महिला एखाद्या क्षणी अचानक दु:खी किंवा आनंदी होऊ शकते. या बदलामुळे वैयक्तिक जीवनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
हॉट फ्लॅशमुळे वाढते शरीराचे तापमान
मेनोपॉजमध्ये हॉट फ्लॅश ही सर्वात सामान्य समस्या आहे. म्हणजे अचानक शरीरामध्ये उष्णता वाढते. छाती, मान आणि चेहऱ्याच्या भागामध्ये उष्णता निर्माण होते, या परिस्थितीस वैद्यकीय भाषेत हॉट फ्लॅश म्हणतात. यामध्ये शरीराचं तापमान अचानक वाढतं आणि हृदयाची धडधडही वाढते.
मेंदूच्या कार्यप्रणालीवर होतो परिणाम
मेनोपॉजदरम्यान केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर मेंदूच्या कार्यप्रणालीवरही दुष्परिणाम होतात. शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडते. यामुळे महिलांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल झाल्यामुळे विचार करण्याची गती मंदावू शकते आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
घामामुळे रात्रीची झोप मोड होते
रजोनिवृत्तीदरम्यान रात्री झोपेत असताना जास्त प्रमाण जास्त घाम येतो, शरीर पूर्णपणे घामानं भिजू शकते, अशा परिस्थितीत शांत झोप मिळणे कठीण ठरते. परिणामी मानसिक आरोग्य आणि शरीराच्या ऊर्जेवर दुष्परिणाम होतात.
नैराश्य, वजन वाढणे | Weight Loss Managementरजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे नैराश्य आणि चिंता विकारांचा सामना करावा लागू शकतो. शारीरिक बदल जसे की वजन वाढणे किंवा त्वचेतील बदल, यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. रजोनिवृत्तीस सुरुवात झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. 'ऑस्टिओपोरोसिस' या आजारासह संधिवात, सांधेदुखीची जोखीम वाढते. रजोनिवृत्तीनंतरच्या टप्प्यात या विकारांमध्ये अनेक पटींनी वाढ होते. वयाच्या 25 ते 30 वर्षांपर्यंत महिलांच्या शरीरातील हाडांचे आरोग्य उत्तम असते, याच काळात योग्य पोषणतत्त्वांचा पुरवठा झाला नाही तर हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीमध्ये अचानक घट झाल्याने हाडांचे नुकसान होणे, हाडांची रचना कमकुवत होणे, हाडं तुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
(नक्की वाचा: Twinkle khanna: 'या' आजाराने त्रस्त आहे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली 'आता जीवन कठीण झाले आहे...')
मेनोपॉज काळामध्ये कोणती काळजी घ्यावी | Menopause Stages Precautions In Marathiआहारामध्ये कोणते बदल करावे? | Menopause Diet Tips- कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीयुक्त आहाराचे सेवन करा.
- आहारात दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकनचा समावेश करा. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये फिरावे.
- हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा, सोयाबीन, अळशीच्या बियांचा आहारात समावेश करा.
- तेलकट, साखरयुक्त आणि खारट पदार्थांचे सेवन टाळा.
- नियमित 30 मिनिटे चालणे, हलक्या स्वरुपातील व्यायाम, योग किंवा स्ट्रेचिंग करा.
- नियमित व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास, हाडे मजबूत राहण्यास आणि मूड चांगला राहण्यास मदत मिळेल.
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करावा, जेणेकरुन हाडांची झीज कमी होईल.
- मेनोपॉजमध्ये मूड बदलणे, चिडचिड होणे, ताणतणाव जाणवणे, झोप न येणे अशीही लक्षणं आढळतात
- ध्यानधारण, श्वसनाचे व्यायाम फायदेशीर ठरतील.
- पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. किमान सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे.
- आवश्यकता भासल्यास समुपदेशनाची मदत घ्यावी.
- रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचे सेवन करावे किंवा औषधोपचार करावे.
- स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करा आणि सूर्यप्रकाशात 10–15 मिनिटे चालावे.
- बोन डेन्सिटी तपासणी करावी (हाडांची घनता कमी होतेय का? हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करावी.)
- थायरॉइड, मधुमेह, लिपिड प्रोफाइलशी संबंधितही वैद्यकीय चाचणी करावी.
- मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअर चाचणी करावी.
- वैद्यकीय तपासणींचा नियमित फॉलो-अप घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)