तीन तासांचा गंभीर बायोपिक हॉलिवूड चित्रपट 'ओपेनहायमर'ने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे अब्जावधी डॉलर्सची कमाई केली आहे. आता तर या चित्रपटाने 7 ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता असे पुरस्कारही मिळाले आहेत. ज्याच्यावर हा चित्रपट बनला हा रॉबर्ट ओपेनहायमर कोण होता? जे. रॉबर्ट ओपेनहायमरने अणुबॉम्बची निर्मिती केली होती.
ज्यूलियस रॉबर्ट ओपेनहायमरचा जन्म 22 एप्रिल 1904 रोजी न्यूयॉर्क शहरातील ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील ज्यूलियस एक जर्मन प्रवासी होते आणि कपडे व्यवसायाचं काम करीत होते. त्यांची आई एला फ्रीडमॅन एक चित्रकार होती. त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या लहान भावाचं नाव फ्रँक होतं.
ओपेनहायमरचे आजोबा 1888 मध्ये जर्मनीमधून हातात काही पैसे नसताना अमेरिकेत आहे होते. त्यावेळी त्यांना इंग्रजी बोलताही येत नव्हतं. मात्र कपड्यांची निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत नोकरी करीत असताना त्यांची परिस्थिती चांगलीच सुधारली. यानंतर हे कुटुंब 1911 मध्ये मॅनहॅटन येथे राहायला आले. रॉबर्ट यांच्याशिवाय त्यांचा लहान भाऊ फ्रँकदेखील भौतिक विषयातील शास्त्रज्ञ होते.
अनेक ठिकाणी घेतलं शिक्षण...
रॉबर्ट यांनी न्यूयॉर्कमधील एथिकल कल्चर शाळेत शिक्षण घेतलं. 1922 मध्ये हॉर्वर्ड विश्व विद्यालयातून रसायन विज्ञान विषयात बीएपर्यंतचं शिक्षण घेत पदवी मिळवली. कँवेडिश प्रयोगशाळेत अभ्यास करण्यासाठी 1925 मध्ये त्यांनी इंग्लंडच्या कँब्रिजमध्ये प्रवेश घेतला. एका वर्षानंतर सैद्धांतिक भौतिक संस्थानात नोबेल पुरस्कार विजेता मॅक्स बोर्नसह प्रशिक्षण घेण्यासाठी जर्मनीमध्ये गोटिंगेन विश्वविद्यालयात प्रवेश घेतला.
ओपेनहायमरने 1927 मध्ये भौतिक विषयात पीएचडी मिळवली आणि ते अमेरिकेत परतले. 1929 मध्ये ते कॅलिफॉर्निया विश्वविद्यालयात बर्कले आणि कॅलिफॉर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे ते क्वांटम यांत्रिकी आणि सैद्धांतिक भौतिक विषय शिकवित होते. 1940 मध्ये त्यांनी जर्मन अमेरिकी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि जीववैज्ञानिक कॅथरीन पुएनिंगसोबत लग्न केलं. त्यांना पीटर आणि कॅथरीन नावाची दोन मुलंही झाली.
3 वर्षात दोन प्रकारचे अॅटम बॉम्ब केले विकसित...
1942 मध्ये ओपेनहायमरची लॉस अलामोस, न्यू मेक्सिको येथे अणुबॉम्ब विकसित करणाऱ्या नव्या शस्त्र प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला मॅनहॅटन प्रोजेक्ट असे कोड नाव देण्यात आले. मॅनहॅटन प्रकल्पामध्ये संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील गुप्त ठिकाणी अनेक प्रयोगशाळांचा समावेश होता.
ओपेनहायमर यांनी लॉस अलामोसनमध्ये अणुबॉम्ब निर्मितीचं गूढ उलगडविण्यासाठी भौतिक शास्त्रातील बेस्ट ब्रेन मानले जाणाऱ्या शास्त्रज्ञांना एकत्र केलं. पुढील अडीच वर्षात त्यांना हवं ते त्यांनी मिळवलं. यानंतर अमेरिकन सरकारने त्यांना 1945 च्या उन्हाळ्यापर्यंत एक युरेनियम बॉम्ब आणि एक प्लूटोनियम बॉम्ब तयार करण्याचे आदेश दिले.
अन् सुरू झालं अणुबॉम्बचं युग..
16 जुलै, 1945 मध्ये ओपेनहायमर आणि लॉस अलमोसच्या शास्त्रज्ञांनी प्लूटोनियम अणुबॉम्बचं पहिलं परीक्षण केलं. ज्याला त्यांनी जॉन डोने यांच्या कवितेनंतर ट्रिनिटी परीक्षण असं नाव दिलं. त्यांनी लॉस एलामोसकडून 210 किमी दक्षिणेकडे बॉम्बच्या परीक्षणासाठी एक जागा शोधली, जी जोर्नाडा डेल मुएर्टो किंवा जर्नी ऑफ डेथ नावाने ओळखली जाते. पहाटे 4 वाजता परीक्षण सुरू होणार होतं, मात्र पावसामुळे ते स्थगित करण्यात आलं. मात्र पहाटे ठीक 5.30 वाजता बॉम्बस्फोट झाला आणि अणुयुग सुरू झालं.
हिरोशिमा अन् नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला...
अणुबॉम्ब परीक्षणाच्या 3 आठवड्यांनंतर 6 ऑगस्ट 1945 रोजी यूरेनियम बॉम्ब (लिटिल बॉय) एनोला गे विमानातून जपानचं शहर हिरोशिमावर पाडण्यात आला. तीन दिवसांनंतर 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर प्लूटोनियम बॉम्ब (फॅट मैन) पाडण्यात आला. या दोन अणुबॉम्ब हल्ल्यात तब्बल दोन लाखांहून अधिक लोक मारले गेले.
आपल्याच कामाने घाबरले होते ओपेनहायमर...
ओपेनहायमर आपल्याच कामाच्या भयानक शक्तीमुळे भयभीत झाले होते. ट्रिनिटी टेस्टच्या सकाळी लॉस एलामोसच्या नियंत्रण कक्षात त्यांच्या डोक्यात 'मी आता मृत्यू बनलो आहे, जो जगाचा नाश करू शकतो' हे भगवतगीतेचे शब्द फिरत होते.
गीतेच्या 11 व्या अध्यायातला तो बत्तीसावा श्लोक असा आहे : कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: | ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा: ||
मान्यतेनुसार या अध्यायात श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूपदर्शन दाखवलं होतं आणि म्हटलं होतं, ‘मी महाकाल आहे, जो लोकांचा नाश करू शकतो. या लोकांच्या नाशासाठी मी आता प्रवृत्त झालो आहे. म्हणून तू युद्ध केले नाहीस, तरी शत्रुपक्षीय सैन्यातील योद्ध्यांचा नाश होणार आहे.'