Akshaye Vinod Khanna : बॉलिवूडमधील खूप कमी अभिनेते असे आहेत , जे कमी सिनेमे करतात मात्र त्यांनी साकारलेली भूमिका वर्षानुवर्षे लक्षात राहते. त्या यादीतील एक नाव म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय खन्ना चित्रपटांबाबत खूप सिलेक्टिव आहे. या वर्षी 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात अक्षय खन्नाने 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. अनेकांना तो अभिनयात विकी कौशलपेक्षाही उजवा वाटला. आता 'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आर माधवन, रणवीर सिंह, संजय दत्त यांसारख्या दिग्गजांनी भूमिका साकारली आहे. मात्र या सर्वात अक्षय खन्नाने विशेष लक्ष वेधलं आहे.
ना कुटुंबाची ना मुलांची हौस...
अक्षय खन्ना इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा वेगळा वाटतो. तो खूप कमी चित्रपट करतो. त्याशिवाय चित्रपटांच्या प्रमोशनसाठीही फारसा दिसत नाही. अक्षय खन्नाला बॉलिवूडच्या पार्टींमध्ये सामील होण्याची फारशी हौस नाही. एका मुलाखतीदरम्यान त्याने अविवाहित राहण्याबद्दलही खुलासा केला आहे. तो म्हणतो, मला मुलं जन्माला घालण्याची फार हौस नाही, नाही मला कुटुंब-संसार थाटण्याबाबत आकर्षण आहे. काही जणांना कुटुंब असावं असं वाटतं. पण मला नाही वाटतं. मला घाईही नाही आणि इच्छाही नाही. लग्न, मुलं, कुटुंब, संसार या गोष्टी मला उत्तेजित किंवा एक्साइट करीत नाही.
दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं, मी अविवाहित आहे. माझ्यावर कोणाचीही जबाबदारी नाही. मला फक्त स्वत:ची काळजी घ्यायची. यापेक्षा आणखी चांगलं आयुष्य कोणतं असू शकतं...
अक्षय खन्नाची हुक स्टेप व्हायरल...
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने धूरंधर या चित्रपटात फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स एन्ट्रीने सर्वांना वेड लावलं आहे. फिल्मिज्ञानसोबतच्या एका मुलाखतीत अक्षयचा सहकलाकार आणि ऑन स्क्रिन भाऊ दानिश पंडोरने सांगितलं, त्यांनी त्या डान्समधील स्टेप्स ठरवून केले नाही. त्याने पुढे सांगितलं, तो डान्स स्क्रिप्टचा भाग नव्हता. अक्षय खन्नाला वाटतं इथं मी एक डान्स करतो आणि त्याने सुरू केलं.