नवरा बायकोतील भांडणे ही काही नवीन नाहीत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमान्युएल मॅक्रॉन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांची बायको त्यांची मुस्कटदाबी करताना दिसली होती. माणूस कितीही ताकदवान असो त्याचे आणि बायकोचे खटके उडतातच अशा प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी दिल्या होत्या. अशातच एका मराठी दिग्दर्शकाला त्याच्या बायकोने मी कायमची माहेरी राहणार असल्याची धमकी दिली आहे.
मराठी दिग्दर्शक विजू माने यांची पत्नी अनघा माने हिने धमकी दिली आहे.'तुम्ही असेच वागत राहिलात तर मी माहेरीच राहेन, परत घरी येणार नाही' असं विजू माने यांना त्यांच्या बायकोने तोंडावर ऐकवलं. यावर अनघा यांची बहीण हसायला लागली. अनघा यांनी हसतेस काय असा प्रश्न विचारला असता तिने सांगितलं की बाबांकडे बघ जरा. अनघा यांनी बाबांकडे बघताच ते 'नको' म्हणून हातवारे करून सांगत होते. बायकोची जिरल्याचा आनंद विजू माने यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
विजू माने हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ते गंमतीशीर रिल्स सतत पोस्ट करत असतात. त्यांच्या रिलमध्ये अनेकदा त्यांची पत्नी अनघा असते आणि बहुतांश वेळा अभिनेता कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकरही असतात. तुमच्या-आमच्या घरात घडणाऱ्या रोजच्या गंमतीशीर घटना हे सगळे मिळून रिल्सच्या रुपात सोशल मीडियावर अपलोड करत असतात. विजू माने यांनी या व्हिडीओला 'सासराच एकमेव आसरा असताना' असं कॅप्शन दिलं आहे. विजू माने यांच्या या रिलवर त्यांच्या एका मित्राने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'अरे मग आता तू संपलास की......आता ती घरीच येणार....खल्लास.'
नक्की वाचा : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला पत्नीने रंगेहाथ पकडलं, थेट घराबाहेर काढलं
चित्रपट दिग्दर्शनासोबतच विजू माने यांनी OTT वरही आपली छाप निर्माण केली आहे. विजू माने, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण यांची स्ट्रगलर साला ही सिरीज युट्युबवर प्रसिद्ध झाली होती. या सिरीजलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिरीजचे पुढचे सीझन लवकरात लवकर यावेत अशी मागणी अनेकजण करताना दिसतात.