Zaheer Khan Son's Name Fatehsingh: माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे आईबाबा झाले आहेत. सागरिका आणि झहीरला मुलगा झाला आहे. दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लेकासोबतचा सुंदर फोटो देखील शेअर केला. फोटो शेअर करत त्यांनी मुलाचं नाव 'फतेहसिंह' असे ठेवल्याचंही चाहत्यांना सांगितले. झहीरने ही माहिती शेअर करताच मुलाचं नाव ट्रेंड होऊ लागले. या नावाचे वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झहीर खानची खास पोस्ट
झहीर खानने मुलगा आणि पत्नी सागरिका घाटगेसोबतचा खास फोटो 16 एप्रिलला सोशल मीडियावर शेअर केला. आम्ही आमचा मुलगा फतेहसिंहचे स्वागत करतोय, असे कॅप्शन त्याने फोटोला दिलं होते. झहीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. फतेहसिंह या नावामागील इतिहास जाणून घेऊया...
फतेहसिंह कोण होते? (Who Was Fateh Singh)
साहिबजादे फतेहसिंग हे शिखांचे दहावे गुरू 'गुरू गोबिंद सिंगजी' यांचे सर्वात छोटे पुत्र होते. त्यांचे वय केवळ सहा वर्षे होते, तेव्हा मुलघांनी त्यांना आणि त्यांचे मोठे भाऊ जोरावर सिंग यांना भिंतीमध्ये जीवंत गाडले होते. 1704 साली सरहिंद नावाच्या ठिकाणी ही घटना घडली होती. इतक्या लहान वयामध्येही फतेहसिंग यांनी शत्रुंना न घाबरता स्वतःच्या धर्माशी तडजोड केली नाही आणि बलिदान दिले. त्यांची आई गुजरी यांनीही मुलांच्या बलिदानाचे वृत्त ऐकून प्राण त्यागले होते. ही घटना अतिशय वेदनादायी होती, पण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. ज्यांनी लाखो शीख बांधवांना धाडसाची शिकवण दिली.
(नक्की वाचा: Sagarika Ghatge And Zaheer Khan Son: सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, मुलाचे ठेवले हे नाव)
भाई फतेहसिंगने घेतला बदला
गुरु गोबिंद सिंग यांचा मुलगा फतेह सिंग यांच्याव्यतिरिक्त आणखी एक फतेह सिंग यांचे नाव इतिहासामध्ये नमूद आहे. भाई फतेह सिंग असे त्यांचे नाव होते, जे एक वीर शीख योद्धा होते. ते गुरू गोबिंद सिंग यांचे अनुयायी होते. बंदा सिंग बहादुर यांच्या सैन्यामध्ये सहभागी होऊन त्यांनी मुघलांविरोधात युद्ध केले. साहिबजादांच्या हत्येचा आदेश देणाऱ्या वजीर खानला त्यांनी ठार मारले.
कित्येक लढायांमध्ये घेतला सहभाग
1. समानाची लढाई (1709)
या युद्धात फतेहसिंग आणि शीख सैन्याने समाना शहरावर हल्ला केला. शीख गुरु आणि त्यांच्या पुत्रांची हत्या करणाऱ्यांचे हे ठिकाण होते.
2. चप्पर चिरीची लढाई (1710)
या युद्धात भाई फतेह सिंग यांनी बाज सिंग यांच्यासह मिळून वजीर खानचे शीर कापले होते. यानंतर शिखांनी सरहिंदवर कब्जा केला होता.
भाई फतेह सिंह यांचा शेवट
भाई फतेह सिंग यांचे शौर्य पाहून खूश झालेले बंदा सिंग बहादुर यांनी त्यांना समाना आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राचे फौजदार बनवले होते. वर्ष 1710 च्या शेवटी मुघल सैन्याने त्यांना पकडलं. कित्येक वर्षे त्यांना यातना दिल्या. अखेर 1716 मध्ये दिल्लीमध्ये बंदा सिंग बहादुर आणि भाई फतेह सिंग यांची त्यांच्या कित्येक साथीदारांसोबत हत्या करण्यात आली.
नावाचा गौरव
झहीर आणि सागरिकाने त्यांच्या मुलासाठी 'फतेहसिंग' या सुंदर नावाची निवड केलीय. झहीर आणि सागरिकामुळे भारताचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा सर्वांसमोर आलाय. मग ते सहा वर्षांच्या वयामध्ये बलिदान देणारे साहिबजादे फतेह सिंग असो किंवा वीर योद्धा भाई फतेहसिंग असो. दोन्हीही नाव धाडस, बलिदान आणि सत्याचे प्रतीक आहेत.