नवी दिल्ली: आज शेअर बाजारात अदाणी ग्रुपचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली. अदाणी एंटरप्रायझेस, अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी पोर्ट्स, अदाणी पॉवर आणि इतर अनेक समभागांसह प्रमुख कंपन्यांमध्ये चांगली वाढ नोंदवली गेली. ज्यामध्ये अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये (Adani Enterprises Share Price) सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, शेअर 4 टक्क्यांहून अधिक वाढीसह ट्रेड करताना दिसत होता.
अदाणी ग्रीन एनर्जी शेअर किंमत आणि अदानी पॉवर शेअरची किंमत देखील 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह बाजारात ट्रेड करताना दिसली. विशेष म्हणजे आज शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मात्र असे असूनही अदाणी समूहाचे शेअर्स मजबूत स्थितीत दिसले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची कारणे!
काल अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी मुंबई आणि अहमदाबाद येथे दोन प्रगत आरोग्य कॅम्पसच्या बांधकामासाठी 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या प्रकल्पात अमेरिकन आरोग्यसेवा क्षेत्रातील दिग्गज मेयो क्लिनिक देखील सहभागी होईल. या गुंतवणुकीचा उद्देश चांगल्या आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा प्रदान करणे आहे, जेणेकरून सामान्य जनतेला स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे उपचार मिळू शकतील.
आरोग्य क्षेत्रातील अदाणी समूहाच्या मोठ्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. या बातमीनंतर आज अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. गुंतवणूकदारांनी या घोषणेकडे अदाणी समूहाचा विस्तार आणि भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची एक मोठी संधी म्हणून पाहिले.
ज्यामुळे बाजारात सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. अदाणी समूहाचा हा निर्णय केवळ आरोग्य सेवा सुधारण्यापुरता मर्यादित नाही तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारासाठी देखील महत्त्वाचा ठरू शकतो. यासोबतच, अदानी ग्रुपच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होत आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये झालेली वाढ:
अदाणी एंटरप्रायझेसचा शेअर 4.04% वाढून 2,383.30 रुपयांवर पोहोचला. अदाणी पॉवरचे शेअर्स 3.40% वाढून 508.10 रुपयांवर पोहोचले. अदाणी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.03% वाढून 983.00 रुपयांवर पोहोचला. अदाणी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर 1.73% वाढून 754.55 रुपयांवर पोहोचला. अदाणी टोटल गॅसचा शेअर 1.42% वाढीसह 617.20 रुपयांवर पोहोचला आहे. अदाणी पोर्ट्सचे शेअर्स 1.03 % वाढून 1,155.95 रुपयांवर पोहोचले. एनडीटीव्हीचे शेअर्स 0.65% ने वाढून140.55 रुपयांवर पोहोचले.
ट्रम्प यांच्या घोषणेचाही परिणाम!
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट 1977 (एफसीपीए) रद्द केला, ज्या अंतर्गत अदाणी समूहाची चौकशी केली जात होती. हा कायदा रद्द झाल्यामुळे, अदाणी समूहावरील खोटे आरोप संपवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ट्रम्प यांनी याला अमेरिकन कंपन्यांना कमकुवत करणारा कायदा म्हटले आणि कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून तो संपवला. यानंतर, अमेरिकेच्या न्याय विभागाला परदेशात व्यवसाय मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप असलेल्या अमेरिकन लोकांवर खटला चालवू नये असे निर्देश देण्यात आले.