Union Budget 2024 : केंद्र सरकारनं नवी कर प्रणाली निवडणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज (23 जुलै) केंद्रीय बजेट सादर केलं. या बजेटनुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आता फक्त 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागत होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
6 ते 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर यापूर्वी 10 टक्के कर द्यावा लागत असे. आता 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर बचत होणार आहे. नव्या कर प्रणाली अंतर्गत येणाऱ्या करदात्यांची मर्यादा 50 हजारांवरुन 75 हजारांपर्यंत वाढणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 मधील बजेट सादर करताना नव्या कर प्रणालीत टॅक्स स्लॅबची घोषणा केली. यानुसार 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना यापूर्वीप्रमाणेच कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. 3 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर द्यावा लागेल. 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर तर 10 ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 15 टक्के कर लावला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
12 ते 15 लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर द्यावा लागेल. तर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना यापूर्वीप्रमाणेच 30 टक्के आयकर द्यावा लागेल.
( नक्की वाचा : Budget 2024 : तरुणांसाठी मोठी घोषणा! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत दरमाह 5000 रुपये मिळणार )
अर्थसंकल्पातील इतर मोठ्या घोषणा
- ग्रामीण आणि शहरी भागात 3 कोटी अतिरिक्त घरे
- औद्योगिक कामगारांसाठी वसतिगृह-प्रकारच्या निवासासह भाड्याने घरे
- शहरी गरिबांना घरे विकसित करण्यासाठी 10 लाख कोटी रुपये
- मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज
- यापूर्वाचे कर्ज यशस्वीरित्या फेडलेल्यांना 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार
- 1 कोटी घरांवरील छतांवर सौर पॅनेलसाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना
- ‘ भारत स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर्स' उभारण्यासाठी सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी करणार