सध्या सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या सोन्याला एक तोळा सोन्याची किंमत 87 हजार 172 इतकी आहे. गेल्या काही महिन्यात हा भाव वाढत चालला आहे. अशा वेळी जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर ती सोने खरेदी करून करा असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ऐवढचं नाही तर बँकेतून कर्ज काढून जरी सोने खरेदी केले तरी तुम्ही फायद्यात रहाल असं ही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढच्या सहा महिन्यात सोन्याचा दर एक तोळ्याला 1 लाखाच्या घरात पोहोचण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्याच्या स्थिती जो कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक करेल त्याला सोन्याचे दिवस येतील असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजेश रोकडे हे ऑल इंडिया जेम्स अँण्ड ज्वेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं की सोन्याचे दर गेल्या काही महिन्यात पाहिले असता हे वाढत आहेत. त्यामुळे सोनं 1लाखाची झेप कधीही घेवू शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणारा परतावा हा डबल असेल असंही ते म्हणाले. त्यामुळे आताच्या तारखेत सोन्यात जे गुंतवणूक करतील ते फायद्यात राहातील असा दावाही त्यांनी केला आहे.
रोकडे यांनी पुढे असंही सांगितलं की जर कर्ज घेवून सोनं घेणार असाल तरी काही हरकत नाही. येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढणार आहेत. त्यामुळे घरात पैसे असतील तर ते सोन्याच्या खरेदीत गुंतवा. ते पैसे बँकेत ठेवूनही त्यातून मिळणारा परतावा हा सोने खरेदीच्या तुलनेत कमी असेल. त्यामुळे कर्ज काढा आणि सोनं खरेदी करा असा सल्लाही त्यांनी या निमित्ताने दिला आहे. सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी योग्य असल्याचेही ते म्हणाले.
येणाऱ्या काळात जवळपास 40 लाख लग्न होणार आहेत. त्यामुळे याकाळात सोन्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. 2023 मध्ये भारतात तब्बल 741 टन सोनं इम्पोर्ट करण्यात आलं होतं. तर 2024 मध्ये 802 टन सोनं भारतात इम्पोर्ट झालं. त्यामुळे सोने खरेदीकडे भारतात कल दिसतो. म्हणूनच पैसे असतील तर ते अन्य ठिकाणी गुंतवण्या पेक्षा सोन्यात गुंतवा. त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल असं रोकडे सांगतात.
गेल्या वर्षी सोने खरेदी करणाऱ्यांना जवळपास 28 टक्के परतावा मिळाला होता. त्यात आता मागच्या दहा दिवसात सोन्याच्या दरात जवळपास पाच हजारांनी वाढ झाली आहे. तर पुढच्या सहा महिन्यात सोन्याचा दर प्रति तोळा एक लाख होईल असा अंदाजही रोकडे यांनी व्यक्त केला आहे. सोन्यात गुंतवणूक ही लाँग टर्मसाठी फायद्याची ठरणारी आहे. सोन्या प्रमाणे चांदीचे दरही वाढत आहेत. अशा वेळी चांदीतही गुंतवणूक करता येईल. सध्या सोन्याचा प्रति तोळा भाव 87 हजार 172 येवढा आहे.