दिल्ली: जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (World's 4th Largest Economy India) बनला आहे. ही माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी (24 मे) दिली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या 10 व्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, जागतिक आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बोलताना बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, "आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आज आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत." आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीचा हवाला देत ते पुढे म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्था आता जपानपेक्षा मोठी झाली आहे. भारताने हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. मला आशा आहे की आपण लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू."
नीती आयोगाच्या सीईओंनी केला मोठा दावा
नीति आयोगाचे सीईओ म्हणाले की, आम्ही आमच्या योजनेवर ठाम आहोत आणि जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आम्ही जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. ते म्हणाले की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगात अशांतता असताना भारताने हे स्थान मिळवले आहे, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारताच्या वाढीला रोखू शकलेले नाहीत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अॅपल आयफोनवर कर लादण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, "आम्हाला आशा आहे की अमेरिकेत विकले जाणारे अॅपल आयफोन भारतात किंवा इतर कुठेही नव्हे तर अमेरिकेतच तयार केले जातील. भविष्यातील कर काय असतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. आम्ही निश्चितच उत्पादनासाठी स्वस्त बाजारपेठ असू."