ITR Filing last date : ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीडीटीने (Central Board of Direct Taxes) 2025-26 या वर्षासाठी आयटीआर फाइल करण्याच्या अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोमवार, 15 सप्टेंबर रोजी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी अनेकांकडून सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी येत होता. परिणामी सीबीडीटीने अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीबीडीटीने सोमवारी रात्री उशीरा एक पत्र प्रसिद्ध केलं. यामध्ये दिल्यानुसार, 2025-26 या वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबरवरुन वाढवत 16 सप्टेंबर करण्यात आली आहे. यापूर्वी 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख होती. यात वाढ करून 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती, आता आणखी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली असून मंगळवार, 16 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करू शकता.
सीबीडीटीने पुढे असंही सांगितलं की, 16 सप्टेंबरला रात्री 12 ते 2.30 वाजेपर्यंत ई-फायलिंग पोर्टलमध्ये काही बदल केले जातील. त्यामुळे हे पोर्टल काही वेळासाछी बंद असेल. सीबीडीटीनुसार, उपकरणांमध्ये बदल करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टल 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 ते 2.30 वाजेपर्यंत पोर्टल काही वेळासाठी बंद असेल.
नक्की वाचा - GST Car Price Change : GST कर बदलांमुळे कोणती कार किती रुपयांनी होणार स्वस्त? किती पैसे वाचतील, पाहा यादी
डेडलाइन का वाढवली?
अनेक ठिकाणी ई-फायलिंग पोर्टलमध्ये गोंधळ असल्याच्या तक्रारी येत होत्या. चार्टर्ड अकाऊंटेटं आणि अन्य लोकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
सर्व्हर डाऊन असल्यामुळे रिटर्न भरण्यास अनेकांना अडचणी निर्माण
15 सप्टेंबरला आयकर विभागाच्या वेबसाईटवर प्रचंड ताण वाढल्याने अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे आयटी रिटर्न भरण्यास अनेकांना अडचणी निर्माण होत होत्या. ही डेडलाईन चुकल्यास दंडासह 31 डिसेंबरपर्यंत बिलेटेड रिटर्न फाईल करावा लागेल. उत्पन्नाच्या आधारावर हा दंड आकारण्यात येतो. यात 5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास 5 हजार रुपये आणि त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्यास 1 हजार रुपये दंड हा आकारला जातो. मात्र आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी अनेकांनी आयटी रिटर्न भरण्यासाठी गर्दी केली होती.