Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विधानसभा निवडणुका 3 महिन्यांवरच आल्या आहेत. त्यापूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घटकांसाठी खास सवलती असतील, असं मानलं जात होतं. अजित पवार यांनी हा अंदाज खरा ठरवला आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांसाठी लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पात सादर केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही मोठ्या सवलती या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुधाचे दर कमी होणार?
अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात गाई दूध उत्पादकांसाठी प्रतिलिटर दूधाला प्रतीलिटर पाच रूपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. नोंदणीकृत 2 लाख 93 हजार दूध उत्पादकांना या योजनेचा फायदा मिळेल. त्यासाठी 223 कोटी 83 लाख रुपयांचं अनुदान वितरीत करण्यात आलं असून उर्वरीत अनुदान त्वरित वितरीत करण्यात येईल, असं पवार यांनी जाहीर केलं. दूध उत्पादकांसाठी 1 जुलैपासून प्रतीलिटर 5 रुपयांनं अनुदान देण्याची योजना 1 जुलैपासून पुढं सुरु ठेवण्यात येणार आहे. या योजनेचा दिलासा सामान्य ग्राहकांनाही होण्याची शक्यता असून त्यामुळे दुधाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करणार
नैसर्गिक आपत्तीमुळे परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून विविध सोयी पुरविण्यात आल्या आहेत. ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. याशिवाय 92 लाख शेतकरी कुटुंबांना अनुदान देण्यात आलं आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
सौर ऊर्जा पंप योजना
शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर उर्जा पंप योजना जाहीर करण्यात आली आहे.
कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ
राज्यातील 44 लाख शेती कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात येणार आहे. राज्यातील 44 लाख शेतकरी शेती कृषी पंपधारक साडे सात हॉर्स पॉवरच्या मोटर चालवतात. यांचा पूर्ण वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
( नक्की वाचा :राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार )
कांदा उत्पादकांना हमी भाव
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे राज्यात गंभीर आहेत. महायुतीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भागात लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. या अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांकडंही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी 350 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे. कांदा आणि कापसाच्या हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
कापूस आणि सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये मदत केली जाणार आहे.
बांबू उत्पादकांना फायदा
अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे व इतर आवश्यक बाबींसाठी प्रतीरोपासाठी 175 रुपये अनुदान देण्यात येईल.राज्यातील पडिक जमिनीवर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 1 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.