मारुती सुझुकीने पुन्हा एकदा विक्रीचा नवा विक्रम नोंदवलाय. गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीने तब्बल 20 लाख गाड्यांची विक्री केली आहे. शुक्रवारी दुपारी मारुती सुझुकीने गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. चौथ्या तिमाहीचा नफा तब्बल 47.8 टक्कांनी वाढल्याचं मारुती-सुझुकीच्या व्यवस्थापनाने यावेळी जाहीर केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या तिमाहीचा नफा सुमारे 3 हजार 877 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. संपूर्ण वर्षभराचा नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत 64 टक्के वाढल्याचंही यावेळी कंपनीने म्हटलं आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीचा टॅक्स वगळून झालेला नफा 8 हजार 49 कोटी रुपये होता. तो 2023-24 या आर्थिक वर्षात 13 हजार 209 कोटींच्या घरात गेलाय.
(नक्की वाचा- देशभरातील WhatsApp बंद होणार? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं?)
मारुती सुझुकीने याबाबत म्हटलं की, कंपनीने मागील आर्थिक वर्षात 20 लाख वाहनांची विक्री केली, जी आजवरची सर्वाधिक आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीचं योगदान 41.8 टक्के आहे. कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.6 टक्के वाढीसह 21,35,323 वाहनांची विक्री केली. देशांतर्गत बाजारात 18,52,256 वाहनांची विक्री झाली. तर 2,83,067 वाहनांची निर्यात झाली.
(नक्की वाचा- कोटक महिंद्रा बँकेवर का केली कारवाई, 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!)
दरम्यान कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षासाठी 125 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपये आहे. मोठ्या प्रमाणात विक्री आणि वाजवी किंमत यामुळे मारुती सुझुकीला छप्पर तोड नफा झाल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.