आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीत NDTV समूहाने उत्तम कामगिरी केली आहे. कंपनीचे उत्पन्न 34% नी वाढले आहे. लोकसभा निवडणुकीचे उत्तम वार्तांकन हे यामागचे मुख्य कारण ठरले आहे. या तिमाहीत NDTV च्या डिजिटल ट्रॅफिकमध्येही जबरदस्त वाढ झाली आहे. या तिमाहीत NDTV चे डिजिटल ट्रॅफीक 44% नी वाढले आहे.
एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, अदाणी समूहाच्या मालकीच्या NDTV समूहाचे उत्पन्न पहिल्या तिमाहीत 93.9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हे उत्पन्न 69.9 कोटी रुपये होते.
या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्चही वाढला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च वाढून 21 कोटींवरून 37.9 कोटी रुपये इतका झाला आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान NDTV ने केलेले वार्तांकन, हाय क्वालिटी प्रॉडक्शन,आणि उत्तम ग्राऊंड रिपोर्टींगमुळे या वृत्तसमूहाने चांगली कामगिरी केली. या माहितीमध्ये असेही म्हटले आहे की, मतमोजणीच्या दिवशी NDTV च्या डिजिटल ट्रॅफिकने अनेक रेकॉर्ड मोडले.या दिवशी NDTV ब्रिटनमध्ये पहिल्या क्रमांकाची आशियाई वाहिनी बनली होती.
NDTV मराठी : NDTV वृत्तसमूहातील सहावा चॅनेल
या तिमाहीमध्ये NDTV ने मराठी वृत्त वाहिनी सुरू केली आहे. ही वाहिनी NDTV वृत्त समूहातील सहावी वृत्तवाहिनी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही वाहिनी लाँच करण्यात आली होती. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मंगल दिनी ही वाहिनी लाँच करण्यात आली होती. लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या, सोखल विश्लेषणामुळे ही वाहिनी अल्पावधीत घराघरात पोहोचली आहे.