शादी डॉट कॉमचे (Shaadi.com) संस्थापक अनुपन मित्तल यांनी कंपन्यांकडे आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याच्या रचनेत पुन्हा विचार करण्याचं आवाहन केलं आहे. ब्रिटिशकालीन पारंपरिक पद्धतीनुसार महिन्याच्या शेवटच्या किंवा पुढच्या महिन्यात पगार देण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोनदा पगार मिळाला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
LinkedIn पोस्टमध्ये काय म्हटलं?
अनुपम मित्तल यांनी LinkedIn वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत जेवण, वर्क फ्रॉम होम आणि मोठ्या सुट्ट्यांसारखे फायदे देते. मात्र अनेकदा ते कर्मचाऱ्यांच्या मूळ गरजेकडे दुर्लक्ष करते. त्यांनी पुढे लिहिलं की, अधिकांश कंपन्या ७ तारीख किंवा त्यापूर्वी कर्मचाऱ्यांना पगार देते. मात्र अनेकदा विकेंड आला तर ही तारीख पुढे सरकते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना उशीरा पगार मिळतो.
कंपनीने केला होता बदल...
अनुपम मित्तल यांनी सांगितलं की, Shaadi.com ने काही वर्षांपूर्वी आपल्या पे-रोल प्रणालीत बदल केला होता. पगार पुढील महिन्यात देण्याऐवजी त्याच महिन्याच्या शेवटी दिला जातो. मित्तल यांच्यानुसार, ही सुविधा नाही तर सामान्य ज्ञानाचा भाग आहे. ते पुढे म्हणाले, पगाराला होणारा विलंब हा केवळ काही दिवसांचा प्रश्न नसतो, तर त्याचा कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो. यामुळे ईएमआय न चुकणे, वेळेवर भाडे भरता न येणे आणि आर्थिक ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. असे म्हणतात की, पैशांचा ओघच खरा आत्मसन्मान आणि सुरक्षितता देतो.
महिन्याला दोन वेळा पगार देण्याचा सल्ला...
अनुपम मित्तल यांच्या सल्ल्यानुसार, कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन वेळा म्हणजेच १५ आणि ३० तारखेला पगार देण्यावर विचार करायला हवा. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ही प्रक्रिया कठीण नाही आणि यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. यामुळे हफ्ताचा दबाव कमी होईल आणि खर्च करण्याची क्षमता सुधारेल. मित्तल यांच्यानुसार, कंपन्यानी या प्रणालीचा स्वीकार केला तर कर्मचाऱ्यांवर आर्थिक दबाव कमी होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेत खर्चाची गती वाढू शकते. त्यांचं म्हणणं आहे की, हे पाऊल कर्मचारी, कंपनी आणि देशाची अर्थव्यवस्था या तिघांसाठी फायदेशीर होऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world