भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पेटीएमच्या पेटीएम बँकवर बंदी घातलीय. आरबीआयनं 31 जानेवारी 2024 रोजी हे निर्देश दिले होते. यापूर्वी 29 फेब्रुवारी ही डेडलाईन होती. त्यानंतर ती 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. RBI च्या निर्देशानंतर पेटीएमच्या ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातल्यानं पेटीएमही बंद पडणार अशी अनेकांना भीती वाटतेय. पेटीएम मनी, वॉलेट याचा वापर युझर्सना करता येईल की नाही? याबाबतही त्यांच्या मनात प्रश्न आहेत. तुम्हालाही हे प्रश्न सतावत असतील तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. आम्ही तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. पेटीएमची कोणती सर्व्हिस सुरु राहणार आहे आणि कोणती बंद होतीय हे आम्ही सांगणार आहोत.
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकवर बंदी घातली आहे. त्याचा पेटीएमवर कोणताही परिणाम होणार नाही. आरबीआयनंही याबाबत स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे तुम्ही पूर्वीसारखंच तुमची सर्व बिल पेमेंट आणि रीचार्ज पेटीएम अॅपचा उपयोग करु शकता. Paytm अॅपमधील अन्य सर्व सुविधा उदा: चित्रपटांची तिकीटं, बुकिंग, विमानाची तिकीट, रेल्वे बुकिंग यावर कोणताही परिणाम होणार नाही.
महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 मार्च 2024 नंतर तुम्हाला पेटीएम बँक वॉलेटमध्ये पैसे टाकता येणार नाहीत. आरबीआयच्या निर्देशानुसार 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँक आणि वॉलेट्समध्ये कोणतेही नवे डिपॉझिट किंवा क्रेडिट होणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेतील रक्कम एखाद्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करावी, असा सल्ला ग्राहकांना देण्यात आलाय.
तुम्ही पेटीएम बँक वॉलेटची सर्व्हिस 15 मार्चनंतरही वापरु शकता. त्याचबरोबर यूपीआय आणि आयएमपीएसच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करु शकता. पेटीएम पेमेंट केल्यानंतर युझर्सना कॅशबॅक, रिफंड तसंच रिवॉर्ड हे फायदे पूर्वीसारखेच मिळतील.
15 मार्चनंतर पेटीएम फास्टटॅगला टॉप करता येणार नाही, तसंच दुसरीकडं हस्तांतित करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तातडीनं एखाद्या अधिकृत बँकेकडून फास्ट टॅग खरेदी करु शकता. तुमच्या पगाराची किंवा एखाद्या योजनेतील रक्कम पेटीएम पेमेंट्स बँकेत येत असेल तर तुम्हाला ही रक्कम दुसऱ्या अकाऊंटशी लिंक करावी लागेल.