रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. दर कपातीनंतर रेपो दर 6.50 वरुन 6.25 टक्के झाला आहे. कर्जदारांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. यामुळे कर्जाचा हफ्ता कमी होईल अशी आशा आता कर्जदारांना आहे.
रेपो दर म्हणजे नेमकं काय?
रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील इतर बँकांना कर्ज देते. रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते. त्याच वेळी, जेव्हा रेपो दरात कपात केली जाते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकते.
(नक्की वाचा- RBI MPC Meet: कर्जदारांना मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात)
रेपो दराच्या तुमच्या कर्जाच्या EMI शी थेट संबंध आहे. रेपो दरातील बदलामुळे कर्जाच्या EMI वर परिणाम होतो म्हणजेच EMI वाढतो किंवा कमी होतो. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कर्जासह इतर सर्व बँकिंग कर्ज रेपो दराशी जोडलेली आहेत.
रेपो रेट कमी झाल्यावर बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकते. परिणामी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, बँका कमी दरात कर्ज देतात, ज्यामुळे त्यांच्यावरील EMI भार कमी होतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आजच्या रेपो दर कपातीच्या निर्णयाचा ग्राहाकांना फायदा होऊ शकतो.
(नक्की वाचा- Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती)
कर्जाचा EMI किती कमी होणार?
रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीनंतर गृह कर्जाचा EMI किती कमी होणार हे उदाहरणासह जाणून घेऊया. जर एखाद्याने बँकेकडून 50 लाखांचं गृहकर्ज 9 टक्के व्याजदराने घेतलं असेल, तर त्याचा EMI 44 हजार 986 रुपये असेल. मात्र बँकांना कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात केली तर EMI 800 रुपयांनी कमी होईल. म्हणजे 50 लाखांवर 8.75 टक्क्यांनी 44 हजार 186 रुपये EMI लागेल. मात्र व्याजदरात किती कपात करायची हे बँकांवर अवलंबून असते. त्यामुळे आता बँका व्याजदरात किती कपात करणार हे पाहावं लागेल.