
शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या SEBI (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर (Arshad Warsi) मोठी कारवाई केली आहे. SEBI नं अर्शद, त्याची पत्नी मारिया गोरेटी (Maria Goretti) आणि इतर 57 जणांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यावर 1 ते 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. या सर्वांवर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टिम्स लिमिटेड) च्या शेअर्सबाबत यूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पैसे परत करावे लागणार
अर्शद वारसी, त्यांची पत्नी आणि इतरांवर लाखो रुपयांची अवैध कमाई केल्याचा आरोप आहे. SEBI च्या तपासणीत समोर आले आहे की, अर्शद वारसीने या योजनेतून 41.70 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीने 50.35 लाख रुपयांचा नफा कमावला. त्यामुळे या दोघांवर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
SEBI ने म्हटले आहे की, सर्व आरोपींनी मिळून एकूण ₹58.01 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई केली आहे. आता या सर्वांना ही रक्कम 12% वार्षिक व्याजासह परत करावी लागणार आहे.
( नक्की वाचा : India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर )
घोटाळ्यात कुणाचा सहभाग?
SEBI च्या 109 पानांच्या अंतिम अहवालानुसार, या संपूर्ण घोटाळ्यामागे गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा हे सूत्रधार (मास्टरमाइंड) होते. साधना ब्रॉडकास्टच्या रजिस्ट्रार कंपनीमध्ये संचालक असलेले सुभाष अग्रवाल यांनी मनीष मिश्रा आणि प्रमोटर्सना संपर्क साधण्याची भूमिका बजावली.
पीयूष अग्रवाल आणि लोकेश शाह यांनी मनीष मिश्रा आणि प्रमोटर्सना त्यांचे खाती वापरण्याची परवानगी दिली. जतीन शाहने या योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कसा झाला घोटाळा?
SEBI नुसार, हा शेअर घोटाळा दोन टप्प्यांत करण्यात आला:
पहिला टप्पा: शेअरची किंमत वाढवणे
प्रमोटरशी संबंधित गुंतवणूकदारांनी आपापसांत व्यवहार करून शेअरची किंमत हळूहळू वाढवली. शेअरची तरलता (लिक्विडिटी) कमी असल्यामुळे कमी व्हॉल्यूममध्येही किमतीवर मोठा परिणाम झाला.
दुसरा टप्पा: यूट्यूबवर प्रचार
यानंतर Moneywise, The Advisor आणि Profit Yatra सारख्या यूट्यूब चॅनेलवर मनीष मिश्राने चालवलेले प्रमोशनल व्हिडिओ अपलोड केले गेले. या व्हिडिओमध्ये साधना ब्रॉडकास्टला एक उत्कृष्ट गुंतवणुकीची संधी म्हणून दाखवण्यात आले. या व्हिडिओंसह बाजारात बनावटी हालचालीही दाखवण्यात आल्या जेणेकरून गुंतवणूकदार आकर्षित होतील.
कधी-कधी झाली कारवाई?
जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान SEBI ला तक्रारी मिळाल्या होत्या की, यूट्यूबवर खोटे व्हिडिओ टाकून शेअरची किंमत वाढवली जात आहे.
2 मार्च 2023 रोजी अंतरिम आदेशात 31 जणांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मार्च 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.
SEBI कडून आता सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून शेअर बाजारात होणाऱ्या फसवणुकीवरही कडक नजर ठेवली जात आहे आणि मोठ्या-मोठ्या व्यक्तींनाही कायद्याच्या कक्षेत आणले जात आहे. ही कारवाई याबाबतचे एक मोठे उदाहरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world