शॉर्टसेलर फर्म हिंडनबर्गने जारी केलेल्या नवीन अहवालावर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माधबी पुरी बुच यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं की, सेबीने हिंडनबर्ग विरुद्ध तपास करुन कारवाई केली होती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावरुन आता हिंडनबर्गने माझ्यावर चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
SEBI च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी परिपत्रक जारी करून शॉर्टसेलर हिंडेनबर्गने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. या आरोपांचा सत्याशी काहीही संबंध नाही. माधबी पुरी बुच यांनी या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले की, "आमचे जीवन आणि आमचे व्यवहार हे एक खुले पुस्तक आहे, आम्ही वेळोवेळी सेबीला सर्व खुलासे दिले आहेत."
बुच दाम्पत्याने म्हटलं की, आमची आर्थिक व्यवहारांची कोणतीही कागदपत्रे प्राधिकरणासमोर सादर करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही. आम्ही जेव्हा सामान्य नागरिक होतो, तेव्हापासूनचे सर्व कागदपत्रे देखील आम्ही सादर करू शकतो.
हिंडनबर्गला सेबीची कारणे दाखवा नोटीस
सेबीने हिंडनबर्गला जुलै महिन्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यानंतर सेबीने अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग आणि नॅथन अँडरसन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. सेबीने आरोप केला की, हिंडनबर्ग आणि अँडरसन यांनी SEBI च्या प्रिव्हेंशन ऑफ फ्रॉडलेंट अँड अनफेयर ट्रेड प्रॅक्टिसेज रेगुलेशन्स, SEBI च्या कोड ऑफ कंडक्ट फॉर रिसर्च अॅनालिस्ट रेगुलेशन्सचं उल्लंघन केलं आहे.