Silver Rate Today: चार महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत चांदीने गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिलाय. सोमवारी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वेबसाइटवरील माहितीनुसार, चांदीचा भाव 3 लाख रुपयांच्या पुढे गेला. एका झटक्यात चांदीच्या किमतीत सुमारे 13,500 रुपयांची वाढ नोंदवली गेलीय. सुमारे 5 टक्के उसळी घेत चांदीचा ताजा भाव 3 लाख 01 हजार 315 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय. दरम्यान सोन्यातही सुमारे 2 टक्के किंवा 3 हजार रुपयांची तेजी पाहायला मिळाली. MCX गोल्ड फेब्रुवारी डिलिव्हरीचा दर 1 लाख 45 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचलाय.
चांदीच्या किमतीत इतकी वाढ का झालीय?
-
जागतिक पातळीवर औद्योगिक मागणीत (Industrial Demand) मोठी वाढ
- भू-राजकीय तणावामुळे (Geopolitical Tensions) सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीची मागणी वाढली
- चांदीच्या पुरवठ्यातील कमतरता आणि डॉलर–रुपया विनिमय दरातील अस्थिरता
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणाम
- अमेरिका आणि युरोपमधील वाढती ट्रेड वॉरची शक्यता
चार महिन्यांत पैसे दुप्पट कसे झाले?
चांदीच्या किमती अतिशय कमी कालावधीत झपाट्याने वाढल्या आहेत. चार महिन्यांपेक्षा कमी काळात चांदीने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. MCX वेबसाइटवर चांदीच्या भविष्यातील भावाने पहिल्यांदा ऑक्टोबर 2025च्या सुरुवातीला 1,50,000 रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला होता. 19 जानेवारी 2026 रोजी चांदीच्या किमतींनी नवा इतिहास रचलाय. MCX वर मार्च फ्युचर्सचा भाव 3,01,315 रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचला. म्हणजेच अवघ्या 3 महिने 20 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.
चांदीत गुंतवणूक: 5 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे (Silver Rate Today FAQs)
चांदीच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता चांदीमध्ये गुंतवणूक करावी का? या संदर्भात NDTVने केडिया अॅडव्हायझरीचे MD अजय केडिया यांच्याशी बातचित केली, त्यांच्याकडून काही प्रश्नांची माहिती जाणून घेऊया...
प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे पुढील मोठे लक्ष्य काय आहे?
उत्तर: केडिया अॅडव्हायझरीच्या मते, भविष्यात चांदीसाठी 100 डॉलरचा स्तर हा पुढील तत्काळ लक्ष्य ठरू शकतो. युरोपियन युनियनवर अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ घोषणांमुळे आणि पुरवठ्याच्या चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण आहे.
प्रश्न 2: देशांतर्गत बाजारात (MCX) चांदी किती उसळी घेऊ शकते?
उत्तर: आंतरराष्ट्रीय संकेतांचा परिणाम भारतीय बाजारातही दिसेल. देशांतर्गत पातळीवर MCX सिल्व्हरसाठी 3 लाख 30 हजार रुपयांचा नवा उच्च स्तर पाहायला मिळू शकतो.
प्रश्न 3: चांदीच्या किमतीत झालेल्या या मोठ्या तेजीमागील मुख्य कारणे कोणती?
उत्तर: या तेजीमागे अनेक कारणे आहेत. केडिया अॅडव्हायझरीनेही काही प्रमुख कारणे सांगितली आहेत. औद्योगिक मागणीत वाढ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे पुरवठ्यात आलेले अडथळे, धातूच्या पुरवठ्यातील सततची कमतरता आणि ETF द्वारे गुंतवणूकदारांची सुरू असलेली खरेदी ही प्रमुख कारणे आहेत.
प्रश्न 4: गोल्ड–सिल्व्हर रेशो (Gold-Silver Ratio) काय संकेत देतो?
उत्तर: गोल्ड–सिल्व्हर रेशो मागील वर्षीच्या 107च्या स्तरावरून सुमारे 53 टक्के घसरलाय. याचा अर्थ चांदीने सोन्याच्या तुलनेत चांगली कामगिरी केलीय. पण सध्या बाजार ओव्हरसोल्ड स्थितीत असल्यामुळे मधेच थोडी नफावसुली होऊ शकते.
प्रश्न 5: सध्याच्या उच्च पातळीवर चांदी खरेदी करणे सुरक्षित आहे का?
उत्तर : उच्च पातळीवर थोडी प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता असली तरी पुरवठ्याशी संबंधित जोखीम आणि मजबूत फंडामेंटल्स पाहता भविष्यात चांदीचा कल वरच्या दिशेनेच राहण्याची शक्यता आहे.
- लक्ष्यावर लक्ष ठेवा (All Eyes on Target): आंतरराष्ट्रीय बाजारात $100चं लक्ष्य आणि देशांतर्गत MCX वर 3,30,000 रुपयांचा स्तर लक्षात घेऊन गुंतवणूक नियोजन करा.
- घसरणीत खरेदी करा (Buy On Dips): बाजार ‘ओव्हरसोल्ड' असल्यामुळे नफावसुलीमुळे किंमती थोड्या घसरू शकतात, अशा घसरणीच्या काळात खरेदीची संधी म्हणून पाहू शकता.
- फंडामेंटल्स समजून घ्या (Understanding Fundamentals): फक्त किमतींकडे न पाहता पुरवठ्यातील कमतरता आणि ETF खरेदीसारख्या मजबूत घटकांवर विश्वास ठेवा.
- गोल्ड–सिल्व्हर रेशोचा वापर करा (Gold-Silver Ratio): चांदीची चांगली कामगिरी लक्षात घेता आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोने आणि चांदीचे संतुलन ठेवा.
- भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवा (Geo Political Developments): डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे आणि सप्लाय चेनशी संबंधित बातम्या बारकाईने पाहा, कारण त्यांचा थेट परिणाम किमतींवर होतोय.
(नक्की वाचा: Gold And Silver Price Today बाबो! चांदीचा नवा रेकॉर्ड, आजचे दर पाहून येईल चक्कर)
चांदी 10 लाख रुपयांचा टप्पा गाठणार का?इंडियन जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी NDTV मराठीने संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, भविष्यात एक किलो चांदी ही 10 लाख रुपयांचा टप्पा गाठताना दिसली तर आश्चर्य वाटू नये. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 5 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं-चांदी हे दर गाठताना दिसू शकेल.
(Disclaimer: ही बातमी तुम्हाला माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलीय. एनडीटीव्ही तज्ज्ञांच्या मताशी सहमत असेलच असे नाही. कोणत्याही परिस्थितीत हे गुंतवणूक सल्ला मानू नये. सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)