जाहिरात

Gold And Silver Price Today बाबो! चांदीचा नवा रेकॉर्ड, आजचे दर पाहून येईल चक्कर

येत्या काळात चांदी नवा विक्रम प्रस्थापित करेल अशी दाट शक्यता असल्याचेही रोकडे यांनी म्हटले. 

Gold And Silver Price Today बाबो! चांदीचा नवा रेकॉर्ड, आजचे दर पाहून येईल चक्कर
मुंबई:

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरांनी भारतात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  देशांतर्गत वायदा बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत 1.49 टक्क्यांची वाढ होऊन ते 1,44,640 रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, चांदीने आज सर्व विक्रम मोडीत काढत 3,00,512 रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

नक्की वाचा: कोट्यधीश भिकारी! 3 घरे, 3 रिक्षा, कार अन् बरंच काही... भीक मागण्याची पद्धत होती युनिक 

सोन्या-चांदीचे दर वाढण्याची मुख्य कारणे काय ?

इंडियन जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी NDTV मराठीने संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी हे मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होण्याचे मुख्य कारण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांकडे ग्रीनलँड (डेन्मार्कचा भाग) खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जोपर्यंत युरोपीय देश अमेरिकाला ग्रीनलँड खरेदी करू देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर प्रचंड आयात शुल्क (Tariff) लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या धमकीनंतर युरोपीय संघानेही आक्रमक भूमिका घेतली असून, अमेरिकेच्या संभाव्य कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. 

चांदीमध्ये गुंतवणुकीकडे कल का वाढलाय?

या तणावामुळे अमेरिकन शेअर बाजार आणि डॉलरच्या मूल्यात घट झाली आहे. जेव्हा डॉलर कमकुवत होतो, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे (Safe Haven Assets) वळतात. परिणामी, मागणी वाढल्याने किमतीत मोठी तेजी आली आहे. तिसरे महायुद्ध पेटण्याची भीती निर्माण झाली असून हेच सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण आहे. रोकडे यांनी पुढे म्हटले की, एका वर्षात एक किलो चांदीचा दर 2 लाख रुपयांनी वाढला आहे. चांदीची मागणी जास्त असून पुरवठा कमी असल्याने चांदीचे दर सातत्याने वाढतच चालले आहेत. येत्या काळात चांदी नवा विक्रम प्रस्थापित करेल अशी दाट शक्यता असल्याचेही रोकडे यांनी म्हटले. 

नक्की वाचा: वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास रिफंड किती मिळेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स

चांदीचे दर किती रुपयांपर्यंत वाढणार ?

राजेश रोकडे यांना चांदीच्या दरांचे भविष्य काय याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, एक किलो चांदी ही 10 लाखांचा टप्पा गाठताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. सोनं प्रति 10 ग्रॅम 5 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला सोनं-चांदी हे दर गाठताना दिसू शकेल असे रोकडे यांनी म्हटले.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com