भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तुफान तेजी पाहायला मिळाली. बुल आणि बेअरच्या लढाईत आज बुल्सचा प्रभाव जास्त दिसून आला. साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी निफ्टी-50 निर्देशांकाने विक्रमी उसळी घेत सर्वकालीक उच्चांक गाठला. निफ्टीने गुरुवारी 22,872.00 ची पातळी गाठली होती. निफ्टी इंट्राडेमध्ये म्हणजे गुरुवारी सत्राची सुरुवात झाल्यापासून 1.1% ची वाढ पाहायला मिळाली. निफ्टी-50 निर्देशांकाचे एकूण मार्केट कॅप एका दिवसात 1.9 लाख कोटींनी वाढले आणि रु. 184.06 लाख कोटींवर पोहोचले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेअर बाजारातील तेजीची कारणे
रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला 2.11 लाख कोटींचा लाभांश जाहीर केला. या लाभांशामुळे वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल. भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालाय. बँक आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. शिवाय अदाणी एंटरप्रायझेस सेन्सेक्समध्ये सामील होणार आहे. या बातमीने अदाणी समूहातील समभागांमध्ये ही तेजी आली आहे. त्याच बरोबर राजकीय स्थिरतेचा गुंतवणूकदारांना विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसत आहे. निफ्टीला पुन्हा उच्चांकी स्तर गाठण्यासाठी 14 सत्रांचा अवधी लागला. या वाढीमध्ये सगळ्यात मोठे योगदान हे वित्तीय सेवा कंपन्यांचे राहिले आहे.
हेही वाचा - सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, आजचे भाव काय?
'या' कंपन्यांच्या समभागात जबरदस्त तेजी
L&T, Axis Bank, ICICI बँक आणि HDFC बँकेने निफ्टी विक्रमी उच्चांकावर नेण्यात सर्वाधिक योगदान दिले. निफ्टी-50 निर्देशांकात अदाणी एंटरप्रायझेस आणि ॲक्सिस बँकांच्या समभागात तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात तेजी असल्याने गुंतवणूकदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.