
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचारी कपातीच्या वृत्ताने सध्या आयटी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीने जुलैमध्ये सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली असताना, सोशल मीडियावर मात्र हा आकडा खूप मोठा असल्याचा दावा केला जातोय.
नक्की वाचा: Accenture Layoffs 2025: AI साठी 11 हजार कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ
सोहम सरकार यांनी पोस्टमध्ये काय दावा केलाय?
'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोहम सरकार नावाच्या व्यक्तीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दावा केलाय की TCS ने खूप मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. सरकार यांनी टीसीएसमध्ये 15 वर्षे काम केलेल्या मित्राच्या हवाल्याने हा दावा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "कॉलेजमधील मित्राच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 80,000 (ऐंशी हजार) कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे." सरकार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रकमेतही फरक आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती पॅकेजमध्ये (Severance Package) मोठी तफावत असल्याचे सरकार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनुसार काही कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपर्यंतचा पगार देण्यात आलाय, काहींना 3 महिन्यांचा पगार, तर काही कर्मचाऱ्यांना काहीही न देता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे आणि इतर आयटी कंपन्यांमध्येही याचे लोण पसरेल अशी भीती देखील या पोस्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.
Met a college friend who works at TCS, and according to him, around 80,000 ( yes 80k, it's not a typo) employees have been let go so far - some with 18 months salary, some with 3 months, and some with zero severance package. This is a staggering number, and I am sure it will…
— Soham Sarkar (@sohamtweet) September 28, 2025
दावा चुकीचा असल्याचे TCS चे स्पष्टीकरण
मात्र, या दाव्यांप्रकरणी NDTV Profit ने टीसीएसच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, त्यांनी हे सर्व दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. टीसीएसने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "एकूण मनुष्यबळाच्या फक्त 2 टक्के कपात करण्यात आली आहे. " TCSने जुलैमध्ये कपातीची घोषणा केली होती आणि या कपातीचा फटका सुमारे 12,261 कर्मचाऱ्यांना बसणार आहे. ही कपात TCS च्या 'फ्यूचर-रेडी ऑर्गनायझेशन' बनण्याच्या धोरणाचा भाग आहे. टीसीएसने तंत्रज्ञान, एआय (AI) चा वापर आणि बाजारपेठेतील विस्तार यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या प्रक्रियेअंतर्गत, जे कर्मचारी अनावश्यक आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world