Weight Loss Remedy Cause Death : आजकाल सोशल मीडियावर वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सुचवले जातात आणि लोक विचार न करता हे उपाय फॉलो करतात. बऱ्याचदा लोक विचार न करता याचा अवलंब करतात. मात्र वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर सांगितलेल्या उपाययोजना जीवघेण्या ठरू शकतात. नुकताच एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. ही घटना तामिळनाडुतील मदुराईतील आहे. येथे एका १९ वर्षाच्या मुलीने वेट लॉससाठी युट्यूबवर व्हिडिओ पाहिला. तिने व्हिडिओमध्ये दिल्याप्रकारे प्रक्रिया केली. यानंतर तिची तब्येत बिघडली आणि यातच तिचा मृत्यू झाला.
युट्यूब चॅनलवर नेमकं काय पाहिलं?
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मदुराईच्या मीनांबलपुरम भागात राहणारी १९ वर्षीय कलैयारसी वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे ती वेगवेगळ्या उपाययोजनांचा शोध घेत होती. तिने एका युट्यूब चॅनलवर पाहिलं की, बोरेक्स नावाचं केमिकल वजन कमी करण्यासाठी वापरलं जातं. या व्हिडिओमुळे प्रभावी झालेल्या कलैयारसीने १६ जानेवारी रोजी मेडिकलमधून हा पदार्थ खरेदी केलं. १७ जानेवारीच्या सकाळी तब्बल ९ वाजता कलैयारसीने घरातच ते केमिकल खाल्लं. काही वेळानंतर तिची तब्येत बिघडू लागली. तिला उलट्या, जुलाब सुरू झाले. कुटुंब घाबरलं होतं. त्यांनी तातडीने कलैयारसीला जवळच्या रुग्णालयात हलवलं. येथे प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठवण्यात आलं. मात्र सायंकाळ होताच तिची तब्येत पुन्हा बिघडली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तरीही तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यानंतर रात्री साधारण ११ वाजता तिची प्रकृती अधिक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर कोणत्याही कारणांसाठी दिलेल्या उपायांचा अवलंब करणं धोकादायक ठरू शकतं.
बोरेक्स पावडर काय आहे? यामुळे मृत्यू कसा झाला?
बोरेक्स एक पांढऱ्या रंगाचं केमिकल आहे. याला सोडियम बोरेट किंवा सोडियम टेट्राबोरेटदेखील म्हटलं जातं. बोरेक्स हा बोरॉन, सोडियम आणि ऑक्सिजन एकत्र करुन तयार केलं जातं. बोरेक्सचा वापर सर्वसाधारणपणे घरात स्वच्छता, कपडे धुण्याची पावडर अधिक परिणामकारक आणि कीटकनाशकसारख्या प्रॉडक्टमध्ये केला जातो. बोरेक्स एक केमिकल आहे. जे आरोग्यासाठी सुरक्षित मानलं जात नाही. बोरेक्स पावडर शरीरासाठी घातक ठरू शकते. बोरेक्स अतिरिक्त प्रमाणात खाल्ल्याने किडनी फेलियर आणि विषबाधा होऊ शकते.