Atishi Oath Ceremony : आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी आज (शनिवार, 21 सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आतिशी यांनी नवा रेकॉर्ड केला आहे. 43 वर्षांच्या आतिशी दिल्लीच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. शपथविधी कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं आहे मंत्रिमंडळ?
आतिशींसोबत पाच मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये मुकेश अहलावत हा एकमेव नवा चेहरा आहे. मुकेश अहलावत 2020 साली पहिल्यांदा आमदार झाले आहेत. ते सुल्तानपूर माजराचे आमदार आहेत. अहलावत उत्तर पश्चिम दिल्लीमधील पक्षाचा दलित चेहरा आहे. सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन हे सर्वजण यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत आनंद व्यक्त केला. त्याचवेळी केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागल्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला. केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कठोर मेहनत घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
'आप' मधील दिग्गज नेत्यांना मागे टाकत आतिशी कशा बनल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री?
केजरीवाल यांनी दिला होता राजीनामा
या आठवड्याच्या सुरुवातीला आतिशी यांना आम आदमी पक्षाच्या आमदारांचा नेता म्हणून निवडण्यात आलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर पक्षानं त्यांची एकमतानं निवड केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world