NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. या आंदोलनात सक्रिय असलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांची प्रकृती खालावली असून त्यांना टायफॉइडची लागण झाल्याचे समोर आले आहे. दीपके यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.
"धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच राहील"
वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर व्हिडिओ संदेशात अभिजीत दीपके म्हणाले, "माझी प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. तपासणी केल्यानंतर मला टायफॉइड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या सकाळी आणि संध्याकाळी उपचार सुरू आहेत. पण माझी प्रकृती कशीही असली तरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील."
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)
20 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर दीपके यांनी अन्नत्याग सुरू केला होता, ज्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती.
CJP आणि सरकारमध्ये आज तिसऱ्या फेरीची बैठक
दुसऱ्या बाजूला, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये तिसऱ्या फेरीची चर्चा होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत नुकसानभरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असली, तरी मुख्य मागणीवर अद्याप तिढा कायम आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)
CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले, "कालच्या बैठकीत नुकसानभरपाई आणि कायदेशीर प्रकरणांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सैद्धांतिक सहमती झाली आहे. आज लिखित करार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, आमची मुख्य मागणी असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नसतील, तर अशा बैठकांना काही अर्थ उरत नाही. सरकार जर राजीनाम्याच्या मुद्द्यावर अडून राहिली, तर आम्हालाही आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी कठोर पावले उचलावे लागतील."