Rising Northeast Investors Summit 2025: अदाणी ग्रुप 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक पुढील 10 वर्षांत ईशान्येकडील राज्यांत करणार असल्याची घोषणा, अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी केली. नवी दिल्ली येथे रायझिंग नॉर्थ ईस्टर्न समिटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गौतम अदाणी यांनी म्हटलं की, रायझिंग नॉर्थ ईस्टर्न समिटमध्ये बोलण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. गेल्या दशकभरात ईशान्येकडील राज्यांनी देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान देत नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. वैविध्यता, जिद्द आणि अमर्याद क्षमतेमध्ये याची मूळे आहेत. हा प्रदेश आपल्यासाठी संस्कृतीचा अभिमान, आर्थिक विकास आणि धोरणात्मक दिशेचा स्त्रोत बनलाय. या प्रदेशाच्या उदयामागे एका नेत्याची दूरदृष्टी आहे, ज्याने कोणत्या सीमांपुरता संकुचित विचार न करता नवी सुरुवात कशी होईल याकडे लक्ष दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅक्ट ईस्ट, अॅक्ट फास्ट, अॅक्ट फर्स्ट असा मंत्र दिला. हा मंत्र ईशान्येकडील राज्यांमध्ये जागृती घडवणारा ठरला. 65 वैयक्तिक भेटी, 6.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, रस्त्यांचे जाळे 16 हजार किमी, एअरपोर्टची संख्या दुपटीने वाढवून 18 करणे या सर्व गोष्टी केवळ एका धोरणाचा भाग नव्हता, तो तुमच्या 'मोठा विचार करा', 'सबका साथ सबका विकास' या घोषवाक्यामागील दृढतेचे प्रतिबिंब होते, असंही गौतम अदाणी यांनी म्हटलं.
नॉर्थ ईस्टमध्ये एकूण 1 लाख कोटींची गुंतवणूक
गौतम अदाणी यांनी पुढे म्हटलं की, 3 महिन्यांपूर्वी आसाममध्ये आम्ही 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आज आम्ही घोषणा करतोय की अदाणी ग्रुप 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक पुढील 10 वर्षांत ईशान्येकडील राज्यांत करेल. यामध्ये हरित उर्जा, स्मार्ट मीटर,हायड्रो पंप स्टोरेज, पॉवर ट्रान्समिशन, रोड आणि हायवे स्किलिंग व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर यांचा समावेश असेल.
आम्ही पायाभूत सुविधांपेक्षा गुंतवणूक लोकांमध्ये करणार आहोत. स्थानिकांना रोजगार मिळावा, स्थानिक उद्योजकांना बळ मिळावे आणि सामुदायिक सहभागासाठी प्रयत्न करणार आहोत. विकसित भारत 2047 चेही उद्दिष्ट हेच आहे. पंतप्रधान मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावरुन आम्ही मार्गक्रमण करू, जनतेचा हात हातात घेऊन पुढे जाऊ. ईशान्येतील राज्यांच्या नागरिकांची स्वप्नं, स्वाभिमान आणि तुमच्या भविष्यासाठी अदाणी समूह खांद्याला खांदा लावून उभा राहिल, असं गौतम अदाणी यांनी म्हटलं.