आपल्याला होणाऱ्या अधिकतर आजारांचे कारण हा चुकीचा आहार आहे. देशातील 56.4 टक्के आजारांचं कारण चुकीचा किंवा असमतोल आहार असल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या एका गाइडलाइन्समधून समोर आलं आहे. तब्बल 13 वर्षांनंतर आयसीएमआरने लोकांच्या आहाराबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. लोकांनी आपल्या धकाधकीच्या जीवनात समतोल आहार घेतला तर गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.
या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दिवसभरात 1,200 ग्रॅम अन्न खाणं आवश्यक आहे. यातून तब्बल 2000 कॅलरीज मिळतात. आपल्या दररोजच्या जेवणाच्या ताटात 100 ग्रॅम फळं, 400 ग्रॅम हिरव्या भाज्या, 300 मिली लिटर दूध किंवा दही, 85 ग्रॅम डाळ किंवा अंड, 35 ग्रॅम सुका मेवा आणि 250 ग्रॅम तृणधान्य यांचा समावेश असणं अपेक्षित आहे. दिवसभरात 27 ग्रॅमपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थाचं सेवन करणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. मांसाहारी खाद्यपदार्थ खाणाऱ्यांसाठी दिवसभरात अधिकतर 70 ग्रॅम चिकन किंवा मटण पुरेसं आहे.
तूपापेक्षा मोहरीचे तेल फायदेशीर...
आपल्या आहारात तीन प्रकारचे फॅटी अॅसिड्स असतात. ज्यात सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड यांचा समावेश होतोय सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडच्या अतिरिक्त सेवनाने कॅलरीचे प्रमाणही वाढते. जास्त कॅलरीज खाल्ल्याने हृदयासंबंधित आजार किंवा स्ट्रोकची भीती असते. नव्या सूचनावली, ट्रान्स फॅटपासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तूप, पाम ऑइल आणि नारळाच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचं प्रमाण सर्वात जास्त असतं. मोहरीच्या तेलात याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. म्हणूनच तूपापेक्षा मोहरीचं तेल तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
(नक्की वाचा - अतिरिक्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन धोकादायक? कोणत्या आजारांना द्याल निमंत्रण, जाणून घ्या!)
चुकीच्या आहाराचा लहान मुलांवर परिणाम
सध्या कमी वयातच लहान मुलांमध्ये वजन वाढणं, स्थूलता, मधुमेहासारख्या आजारांची लागण होत आहे. जीवशैलीव्यतिरिक्त 'आहार' हे यामागील एक कारण आहे. हेल्दी खाद्य पदार्थांपेक्षा जास्त फॅट, साखर आणि जास्त मीठ असलेले पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सेरेलेक देण्यास नकार देण्यात आला आहे.
प्रोटीन सप्लीमेंट नको...
आयसीएमआरने बॉडी मास्क वाढवण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट न घेण्याचा सल्ला दिला आहे. बराच काळ नियमित प्रोटीन पावडरच्या सेवनाशी अनेक धोके जोडले गेले आहेत. प्रोटीन सप्लीमेंटमध्ये साखर, अंड, डेअर प्रोडक्ट, सोया सारख्या पदार्थांचा समावेश असतो आणि दररोज या पदार्थांचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कोणत्या भाड्यांमध्ये अन्न शिजवणं फायद्याचं?
मातीची भांडी सर्वात सुरक्षित असतात. ही भांडी इकोफ्रेंडली असतात. ही भांडी वापरताना कमी तेल लागतं आणि खाद्यपदार्थातील पोषणतत्व कायम राहतं. मेटलच्या भांड्यात चटणी, दही, सांबर यांसारखे अॅसिडीक पदार्थ ठेवू नये. स्टीलची भांडी वापरण्यास काहीच अडचण नाही. यातून केमिकल पदार्थांमध्ये जात नाहीत.