- अहिल्यानगर जिल्ह्याच्या 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांचा अनोखा उपक्रम
- शुक्ल यजुर्वेदाच्या दोन हजार मंत्रांचे दण्डक्रम पारायण 50 दिवसांत पूर्ण केले
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खास पोस्ट केली शेअर
Vedamurti Devavrat Mahesh Rekhe: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी अतिशय असामान्य पराक्रम केलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केलंय. "19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांनी केलेली कामगिरी पाहून मला खूप आनंद झालाय. त्यांचे हे यश भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल", असे कौतुकोद्गार पंतप्रधान यांनी काढले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर देवव्रत महेश रेखे यांचे फोटो शेअर करून PM मोदींनी खास पोस्ट शेअर केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचे केले कौतुक
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलंय की, भारतीय संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे जाणून आनंद होईल की श्री देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यन्दिन शाखेच्या दोन हजार मंत्रांचे 'दण्डकर्म पारायणम्' 50 दिवसांत कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केले. यामध्ये अनेक वैदिक स्त्रोत्र आणि पवित्र शब्दांचा उल्लेख आहे, ज्यांचा त्यांनी शुद्ध उच्चारणासह पठण केले. ही कामगिरी आपल्या गुरू परंपरेचे सर्वोत्तम रूप दर्शवते. काशीचा खासदार म्हणून मला अभिमान आहे की त्यांची अद्भुत साधना या पवित्र भूमीवर संपन्न झाली. मी त्यांच्या कुटुंबाला, संतांना, ऋषीमुनींना, विद्वानांना आणि देशभरातील त्या सर्व संस्थांना अभिवादन करतो ज्यांनी या तपश्चर्येत रेखे यांना साथ दिली."
पीएम मोदी ने सोशल मीडिया पोस्ट में देवव्रत की तारीफ की.
देवव्रत यांनी 200 वर्षांनंतर पूर्ण केलं 'दण्डकर्म पारायणम्'
19 वर्षांच्या देवव्रत रेखे यांनी दोन हजार मंत्र आणि वैदिक श्लोकांचे शुद्ध उच्चारणासह पठण केले. भारताच्या सनातन गुरू परंपरेत यास "दंडक्रम पारायण" म्हणतात. हे पारायण पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्तीस वेदमूर्ती ही पदवी देऊन सन्मानित केले जाते. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असणारे देवव्रत महेश रेखे यांनी 200 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय.
देवव्रत महेश रेखे यांचा सन्मान
खंड न पाडता पूर्ण केले पठण
दंडक्रम पारायणामध्ये शुक्ल यजुर्वेदाच्या जवळपास दोन हजार मंत्रांचा समावेश आहे, उच्चारणास हे मंत्र अतिशय कठीण आहेत. याच मंत्रांचे 50 दिवस खंड न पाडता पठण त्यांनी पूर्ण केले. वैदिक परंपरेनुसार जवळपास 200 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शुद्ध शास्त्रीय शैलीत पठण केल्याचे मानले जातंय.
देवव्रत वैदिक मंत्रांचे पठण करत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला. ज्यामध्ये ते कोणतेही ग्रंथ न पाहता, कुठेही न अडखळता वैदिक मंत्रांचे शुद्ध उच्चारणासह पठण करताना दिसत आहेत. हे यश संपादित केल्यानंतर देवव्रत महेश रेखे यांना 5 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे एक आभूषण आणि 1 लाख 11 हजार 116 रोखरक्कम देऊन सन्मान करण्यात आलाय. श्री शृंगेरी शारदा पीठमचे जगद्गुरू शंकराचार्यांच्या आशीर्वादाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोण आहेत देवव्रत महेश रेखे?
देवव्रत महेश रेखे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत असे आहे. देवव्रत हे वाराणसी येथील संगवेद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दंडक्रम पारायण पूर्ण करण्यासाठी ते नियमितपणे चार तास सराव करायचे, अशी माहिती आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X'वर पोस्ट करत म्हटलं की, "वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, श्रीक्षेत्र काशी येथे 50 दिवसांपासून 165 तासांपेक्षा जास्त काळ अत्यंत कठीण अशा ‘दण्डक्रम' चे पारायण करून 'दण्डक्रम विक्रमादित्य' पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांचे मनापासून अभिनंदन आणि वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो ही मनस्वी शुभेच्छा."