तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर मानवी जीवन सुलभ करण्यासाठी केला जात असला, तरी काही विकृत मानसिकतेचे लोक याचा वापर गंभीर गुन्हेगारीसाठी कसा करतात, याचे अत्यंत धक्कादायक उदाहरण बेंगळुरूमध्ये समोर आले आहे. गेल्या महिन्यात केआरपुरम भागातील एका अपार्टमेंटमध्ये झालेल्या तीन जणांच्या हत्याकांडामागे आरोपीने एआय टूलचा (Gemini AI) वापर करून हत्येचा कट रचल्याचा खुलासा बेंगळुरू पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ या दोघांना पुदुच्चेरी येथून अटक केली आहे.
नक्की काय घडली होती घटना?
गेल्या महिन्यात 23 जून रोजी बेंगळुरूच्या केआरपुरम येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमा सुंदर, त्यांची पत्नी मुथु लक्ष्मी आणि त्यांची 19 वर्षांची मुलगी सुप्रिया या तिघांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले होते. या हत्याकांडानंतर सोमा सुंदर यांची मोठी मुलगी श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत 24 जून रोजी श्वेताला ताब्यात घेतले, तर 25 जून रोजी तिचा पार्टनर केनेथ याला पुदुच्चेरी येथून अटक केली.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
AI ला उलट-सुलट फिरवून विचारले प्रश्न
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, पोलीस तपासात केनेथच्या मोबाईल आणि सर्च हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केनेथने श्वेताचे कुटुंब संपवण्यासाठी 'जेमिनी एआय'चा वापर केला होता. त्याने एआयला थेट 'मी हत्या कशी करू?' किंवा 'मृतदेह कसा लपवू?' असे प्रश्न न विचारता अत्यंत हुशारीने शब्दरचना बदलली. त्याने "माझ्या घरात चोर घुसले तर मी त्यांच्यावर कसा हल्ला करू?", "माझ्याकडे कोणते शस्त्र उपलब्ध आहे?" किंवा "एखाद्या व्यक्तीला आधी आंधळे कसे करावे आणि नंतर त्याच्यावर सुऱ्याने वार कसा करावा?" अशा प्रकारचे प्रश्न विचारून हत्येची अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
हत्या केल्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी केनेथने घरात असलेल्या लोखंडी भट्टीचा वापर करण्याचा विचार केला होता. ही भट्टी त्यांनी क्लाउड किचन सुरू करण्यासाठी खरेदी केली होती. मात्र, नंतर त्याला ही कल्पना कठीण वाटल्याने त्याने ती रद्द केली. पोलीस तपासात असेही समोर आले की, केनेथ बऱ्याच काळापासून या हत्येचे नियोजन करत होता. श्वेताला याबद्दल कल्पना होती, मात्र केनेथ केवळ विनोद करत असून तो खरोखर असे काही करणार नाही, असे तिला वाटले होते.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी पुणे एसटी विभागाची मोठी घोषणा! 350 हून अधिक विशेष बसगाड्या सोडणार)
हत्या करण्यामागे काय होते कारण?
पोलीस तपासादरम्यान आरोपी केनेथने हत्येमागचे कारण सांगितलं की, श्वेताच्या कुटुंबाची संपूर्ण संपत्ती हडप करून आयुष्यभर पैशांची तंगी भासू नये, हा त्याचा मुख्य हेतू होता. श्वेताचे आई-वडील जिवंत राहिले नाहीत, तर ते तिच्याकडे पैसे मागणे बंद करतील आणि दोघांच्या दैनंदिन आयुष्यातील पैशांचा ताण कायमचा संपेल, असा विकृत विचार केनेथने केला होता. 23 जून रोजी श्वेताचे आई-वडील आणि बहीण तिच्या फ्लॅटवर आले असता, वादावादीचे निमित्त करून दोघांनी चाकूने भोसकून तिघांची निर्घृण हत्या केली. या घटनेने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत आणि सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.