यशपाल सोनकांबळे, पुणे
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुणे विभागाने 350 हून अधिक विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 21 जुलै ते 26 जुलै या कालावधीत ही विशेष एसटी सेवा 24 तास कार्यरत राहणार आहे. पुणे एसटी विभागाचे विभागीय नियंत्रक कमलेश धनराळेयांनी या विशेष बससेवेचे नियोजन आणि सुविधेबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
स्वारगेट आणि प्रमुख स्थानकांतून गाड्या सुटणार
वारकऱ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकासह पुणे जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख बसस्थानकांतून या विशेष गाड्या पंढरपूरसाठी रवाना होतील. 21 ते 26 जुलैदरम्यान प्रवाशांची उपलब्धता पाहून 24 तास टप्प्याटप्प्याने गाड्या सोडल्या जातील, जेणेकरून कोणत्याही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही. पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार आणखी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न
दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. यंदाही वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आगाऊ नियोजन केले आहे. सुरक्षित, आरामदायी आणि विनासायास प्रवासासाठी जास्तीत जास्त वारकरी आणि भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक कमलेश धनराळे यांनी केले आहे.
सवलती लागू असणार
सरकारकडून मिळणाऱ्या सवलती देखील या प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत, महिलांसाठी असणारी 50 टक्के तिकीट दर आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवासी सवलती, या विशेष यात्रेच्या गाड्यांनाही पूर्णपणे लागू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world