Air India Plane: एअर इंडियाच्या विमानांमधील गडबडीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा आहे. त्याचवेळी एअर इंडियाचे आणखी एक विमान अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून व्हिएन्नाला जाणाऱ्या एआय 187 या विमानाने उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे विमान सुमारे 900 फूट खाली आले. मात्र, सुदैवाने विमान अपघातातून थोडक्यात बचावले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमके काय घडले?
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग 777 विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच धोकादायक पद्धतीने खाली येऊ लागले. पायलटना कॉकपिटमध्ये 'स्टॉल वॉर्निंग' आणि 'ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम' (GPWS) ची 'डोन्ट सिंक' वॉर्निंग मिळू लागली, त्यानंतर त्यांना तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली.
या विमानानं पहाटे 2.56 वाजता उड्डाण केले. त्यावेळी दिल्लीत जोरदार वादळ आणि खराब हवामान होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान सुमारे 900 फूट खाली आले. याच दरम्यान 'स्टिक शेकर' अलार्मही सक्रिय झाला – म्हणजे कॉकपिटचे कंट्रोल कॉलम हलू लागले आणि पायलटना त्वरित धोक्याची जाणीव झाली.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : शेवटच्या सेकंदात काय झालं? 'ते' रहस्य आता उलगडणार, ब्लॅक बॉक्समधून मिळाला डेटा )
पायलटने तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि विमान योग्य उंचीवर आणून उड्डाण सुरू ठेवले. सुदैवानं या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही आणि विमानाने ९ तास ८ मिनिटांच्या उड्डाणानंतर व्हिएन्नामध्ये सुरक्षित लँडिंग केले. तेथून काही वेळाने दुसरा क्रू आला आणि तो फ्लाइट घेऊन टोरोंटोसाठी रवाना झाला.
DGCA कडून चौकशी सुरु
महत्त्वाची बाब म्हणजे, पायलटने दिलेल्या अहवालात फक्त 'उड्डाणानंतर टर्ब्युलन्समुळे स्टिक शेकर सक्रिय झाला' असे लिहिले होते. इतर धोक्याच्या सूचनांची कोणतीही माहिती दिली नव्हती. पण, डीजीसीएने अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) ची तपासणी केली, तेव्हा 'जीपीडब्ल्यूएस डोन्ट सिंक' आणि 'स्टॉल वॉर्निंग' सारख्या गंभीर सूचनाही आल्या होत्या हे उघड झाले.
या प्रकरणामध्ये एअर इंडियाच्या प्रवक्त्याने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 'पायलटचा अहवाल मिळाल्यानंतर, नियमांनुसार डीजीसीएला प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर, विमानातील रेकॉर्डरमधून डेटा मिळाल्यानंतर, पुढील चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीचे निकाल येईपर्यंत दोन्ही पायलटना उड्डाण ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.'
यापूर्वी 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर डीजीसीएने (DGCA) विमानांच्या सुरक्षिततेबाबत विशेष निर्देश जारी केले आहेत.