Ajit Pawar Death : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणाचे तीव्र पडसाद थेट संसदेत पाहायला मिळाले असून शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नसून त्यामागे काही मोठे रहस्य दडलेले असू शकते, असा खळबळजनक दावा राऊत यांनी राज्यसभेत केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत असतानाच गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते आणि ते एनडीएचे सहकारी सुद्धा होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण राज्य धक्क्यात आहे.
मात्र हा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असून याची मुळापर्यंत चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी सभागृहात मांडले.
( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )
सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा उल्लेख
राऊत यांनी आपल्या भाषणात एका विशिष्ट फाईलचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली. त्यांनी सांगितले की, 15 जानेवारी रोजी अजित पवार यांनी भाजपला एक गंभीर इशारा दिला होता. सिंचन घोटाळ्यात भाजपाने मोठा पैसा खाल्ला असून त्याची फाईल आपल्याकडे असल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते.
या वक्तव्यानंतर अवघ्या 10 दिवसांतच विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. माझ्या माहितीनुसार, अजित पवार ती महत्त्वाची फाईल नेहमी स्वतःसोबत ठेवायचे. ज्या दिवशी ते मुंबईहून बारामतीला जाण्यासाठी निघाले, त्या दिवशीही ती फाईल त्यांच्याकडेच होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
न्यायमूर्ती लोया प्रकरणाची आठवण
अजित पवार यांच्या अपघाताची घटना पाहिल्यानंतर मला न्यायमूर्ती लोया यांच्या प्रकरणाची आठवण झाली, असे राऊत यांनी यावेळी नमूद केले. या दुर्घटनेमागे काही मोठे कारस्थान तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
ही घटना नैसर्गिक अपघात आहे की घडवून आणलेली दुर्घटना, हे स्पष्ट होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी लावून धरली आहे. राऊत यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरणात मोठ्या चर्चांना उधाण आले असून यावर सत्ताधारी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.