अमेरिकेची कँडिस कर्णे (Candace Karne) हिने तिचा मराठमोळा पती अनिकेत कर्णेसोबतचं (Aniket Karne) नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी मराठी शिकायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी-हिंदी वाद सुरू झाला असून अनेक परप्रांतीय मराठीत बोलणार नाही अशी मुजोरी करताना दिसत आहेत. अशा सगळ्यांसाठी हा व्हिडीओ एक उत्तम धडा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कँडीसने तिच्या नवऱ्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली असून, त्याने जेव्हा तिला मराठी बोलताना ऐकलं तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला जगभरातील लोकांनी आणि खासकरून मराठी भाषा प्रेमींनी जबरदस्त दाद दिली आहे.
जेवायला काय आहे ?
या व्हिडिओमध्ये, कँडिसने अनिकेतला सकाळी पाहताच "शुभ सकाळ, कसा आहेस?" असे म्हटले. ते ऐकून अनिकेतला बसलेला आश्चर्याचा धक्का त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून स्पष्टपणे दिसत होता. कँडीसने प्रत्येक मराठी शब्द आणि वाक्य अचूकपणे बोलण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला. तिचं तोडकं मोडकं मराठी ऐकून अनिकेत म्हणजेच तिच्या नवऱ्याला हसू येत होतं मात्र तो तिच्या मराठी बोलण्याच्या प्रयत्नांवर खूशही झालेला दिसला. अनिकेतने हसून तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं यावर तिने हसून त्याला सांगितलं की त्याने दिलेलं उत्तर तिला आवडलं मात्र तो काय बोलला हे तिला कळालं नाही. कँडीसने अनिकेतशी मराठी बोलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला असून तिने " नमस्कार" , "रात्री जेवायला काय आहे?" असे शब्द उच्चारताच अनिकेतही मनोमन सुखावल्याचे स्पष्टपणे दिसते. रात्री जेवा.ला का आहे असं विचारलं असता अनिकेत तिला म्हणतो आज चिकन बनवणार आहे. यावर तिने त्याला धन्यवाद असे उत्तर दिले.
(नक्की वाचा: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पुण्यातून लवकरच 4 नव्या 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार )
नवऱ्याला अहो म्हणा!
कँडीसने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेकांनी कँडीसने मराठी भाषा शिकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि अनिकेतसोबतचं नात घट्ट व्हावं यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांसाठी दाद दिली. एकाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "पुढच्या वेळी, 'अहो ऐका' म्हणा आणि त्याला लाजू द्या." तर दुसऱ्या एकाने म्हटलंय की, "कृपया एकदा त्याला 'अहो' म्हणा, कारण एक मराठी स्त्री तिच्या पतीला अशीच हाक मारते." अन्य एकाने म्हटलंय की, "जेव्हा तुम्ही त्याच्या मूळ भाषेत बोलत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हसूच अनेक गोष्टी सांगून जातं." अन्य एकाने म्हटलंय की मी महाराष्ट्रीय असून हे फारच गोड आहे, तुला मराठी शिकण्यासाठी मदत लागली तर सांग.