गुरुवारच्या दिवशी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
गुरुवारचा दिवस हा अत्यंत वाईट ठरला. अहमदाबादहून लंडनला (Ahmedabad London Flight) जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. 242 जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानामध्ये 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे मिळून एअर इंडियाचे एकूण 12 कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांमध्ये मैथिली पाटील (Air India Crew Member Maithili Patil) आणि अपर्णा महाडिक (Air India Crew Member Aparna Mahadik) या दोन मराठी महिलांचाही समावेश होता. यातील अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या नात्यातल्या आहेत.
नक्की वाचा : एअर इंडियाच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश
अपर्णा महाडिक या तटकरेंची भाचेसून
अपर्णा महाडिक ही माझ्या छोट्या बहिणीची सून होती आणि महाडिक कुटुंब गोरेगाव इथे राहाते असे सुनील तटकरेंनी PTI शी बोलताना सांगितले. माझा भाचा हा देखील एअर इंडियामध्ये असून तो देखील केबिन क्रू म्हणून काम करतो. तो सध्या दिल्लीमध्ये असून ही वाईट बातमी महाडिक कुटुंबाला देण्यात आली आहे असे तटकरेंनी सांगितले.
अहमदाबाद विमानतळ तात्पुरते बंद केले
दरम्यान या दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी रात्री 9.25 वाजता नागपूर येथून अहमदाबादला जाणारे विमान रद्द करण्यात आले. तसेच अहमदाबादहून नागपूरला सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी निघणारे विमान देखील रद्द करण्यात आले. नागपूरला अहमदाबादवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. नागपूर येथून अहमदाबादसाठी सकाळी 8.35 वाजता आणि रात्री 9.25 वाजता विमान आहे. तर अहमदाबादहून नागपूरसाठी येथून पहाटे 5.50 वाजता आणि सायंकाळी 6.55 वाजता विमान आहे.
विमानातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही
अहमदाबाज पोलीस आयुक्तांनी AFP शी बोलताना भीती व्यक्त केली की या दुर्घटनेमध्ये विमानातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही. या विमानातून क्रू मेंबर्स आणि प्रवासी मिळून एकूण 242 जण प्रवास करत होते. या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. याशिवाय ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथेही काहीजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानातून भारतीय नागरिकांशिवाय परदेशी नागरीकही प्रवास करत होते.
- भारतीय प्रवासी -169
- ब्रिटीश प्रवासी - 53
- कॅनडाचा प्रवासी -1
- पोर्तुगालचे प्रवासी-7
DGCA ने दुर्घटनेची चौकशी सुरू केली अहमदाबाद इथे घडलेल्या दुर्घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने चौकशी सुरू केली आहे. AI-171 हे अहमदाबाद-लंडन विमान टेक ऑप होताच काही मिनिटांत कोसळलं होतं. डीजीसीएच्या प्रवक्त्यांनी म्हटले की तूर्तास ही दुर्घटना कशी घडली याचे निश्चित कारण कळू शकलेले नाही मात्र सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सगळ्या संबंधित यंत्रणा याची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एयर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलाइनर हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या रनवे 23 वरून 13.39 वाजता टेक ऑफ केलं होतं. विमान हवेत झेपावताच काही मिनिटांमध्येच ते कोसळलं होतं. विमानाकडून 'मेडे' कॉल देण्यात आला होता, मात्र त्यानंतर विमानाशी असलेल्या संपर्क तुटला होता. सुमित सभरवाल हे या विमानाचे पायलट होते. सुमित यांना एअर इंडियाची विमाने उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या गाठीला 8200 तास विमान उडवण्याचा अनुभव होता. फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्याकडे 1,100 तास विमान उडवण्याचा अनुभव होता.