जाहिरात

Air India crash crew death : एअर इंडियाच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश

Ahmedabad London Flight Crash : या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे.

Air India crash crew death : एअर इंडियाच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश
मुंबई:

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले. अहमदाबादच्या मेघानी नगर भागात ही दुर्घटना घडली आहे. इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले असून यामध्ये नेमकी किती हानी झाली आहे याचा निश्चित अंदाज बांधणे अवघड झाले आहे. या दुर्घटनेत विमानातील काही प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. 

नक्की वाचा : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, पाहा भीषण दुर्घटनेचे फोटो

क्रू मेंबरपैकी दोघे महाराष्ट्रातले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल बोलताना म्हटले आहे की, आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहेत, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो.

नक्की वाचा : अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात!

उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे. मी माझी सहवेदनाही व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सहभागी आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, गुजरात सरकार, केंद्र आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना उत्तम उपचार मिळावेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

मेघानी नगर हादरले

या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती, जी विझवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र शासन आवश्यक ती सर्व मदत करेल आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात देणं आवश्यक आहे. या दु:खद घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती लाभो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com