अयोध्याच्या राम मंदिरालाही पावसाळ्यातील पाणी गळतीचा सामना करावा लागत आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेथे रामलल्ला विराजमान आहेत, तेथे पहिल्याच पावसात पाणी गळत आहे. आतही पाणी साचलं होतं. त्यामुळे राम मंदिर बांधकामादरम्यान काही हलगर्जीपणा झाला आहे का, याचा तपास घ्यायला हवा. मंदिरात पाणी जमा झाले असून ते बाहेर काढण्यासाठी कोणतीच जागा नाही. शिवाय छतावरून पाणी गळत आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला तर येथे पूजा करणं कठीण होईल असंही मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - महाराष्ट्र भाजपामध्ये बैठकांना 'जोर', फडणवीस-बावनकुळे दिल्लीत दाखल
भाजपच्या एजेंड्यावर असलेल्या राम मंदिराची निर्मिती आणि लोकार्पण लोकसभेपूर्वी पार पडलं. 22 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात राम मंदिराचं लोकार्पण पार पडलं. यासाठी देशभरातील दिग्गज व्यक्तिमत्त्व उपस्थित होते. मात्र पहिल्याच पावसात राम मंदिरात गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भव्य अशा या मंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप येथील पुजाऱ्यांकडून केला जात आहे.