Bio CNG Pump: आता शेणावर धावणार गाडी! गुजरातमध्ये देशातील पहिला 'बायो-सीएनजी' पंप यशस्वी; किंमत किती असणार?

Bio CNG Pump: गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात 'बनास डेअरी' आणि 'मारुती सुझुकी' यांनी मिळून गुरांच्या शेणापासून 'बायो-सीएनजी' बनवण्याचा देशातील पहिला यशस्वी व्यावसायिक प्रयोग केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

भारतात सध्या इंधनाच्या वाढत्या किमती आणि आयातीचे मोठे आव्हान असताना, देशातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गुरांच्या शेणापासून तयार होणारा गोबरगॅस किंवा बायोगॅस आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरला जात होता. मात्र, आता याच बायोगॅसवर वाहनेही रस्त्यावर सुसाट धावणार आहेत. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात 'मारुती सुझुकी' आणि 'बनास डेअरी' (Banas Dairy) यांनी संयुक्तपणे हा ऐतिहासिक प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. येथील विशेष बायो-सीएनजी पंपावर दररोज 600 ते 700 वाहने इंधन भरत आहेत.

प्रकल्प कसा असेल आणि दर काय असतील?

ग्रामीण भागात बायोगॅस अनेक ठिकाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध असला, तरी पूर्णपणे व्यावसायिक आणि वाहनांच्या इंधनासाठी त्याचा वापर करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. 'ब्लूमबर्ग'च्या ताज्या अहवालानुसार, बनासकांठा येथील पंपावर शेणापासून शुद्ध करून तयार करण्यात आलेला नैसर्गिक वायू म्हणजेच 'बायो-सीएनजी' विकला जात आहे. या बायो-सीएनजीचा दर 80 रुपये प्रतिकिलो इतका आहे, जो नेहमीच्या पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त आहे. या प्लांटसाठी परिसरातील 16 गावांमधून दररोज सुमारे 88 टन शेण गोळा केले जाते.

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: बुकिंगची कटकट संपणार, अवघ्या काही मिनिटात सिलेंडर मिळणार घरपोच; कुठे मिळेल ही सुविधा?)

शेतकऱ्यांना फायदा 

शेण देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना 1 रुपये किलोचा दर दिला जात आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना शेतीसोबतच शेणातूनही अतिरिक्त उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळाले आहे. याशिवाय, गॅस तयार झाल्यानंतर उरलेले शेण उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून पुन्हा शेतकऱ्यांनाच विकले जात आहे.

डेअरीचे नेटवर्क आणि मारुती सुझुकीचे भांडवल

हा प्रकल्प यशस्वी होण्यामागे बनास डेअरी आणि मारुती सुझुकी यांचा उत्तम समन्वय आहे. बनास डेअरीकडे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क आणि शेणाची सहज उपलब्धता होती, तर मारुती सुझुकी समूहाने या प्रकल्पासाठी लागणारे मोठे भांडवल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवले. कॉर्पोरेट क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सहकारी क्षेत्रातील नेटवर्क एकत्र आल्यास किती मोठा बदल घडू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

'बायोगॅस'समोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी

हा प्रयोग वरकरणी अत्यंत क्रांतिकारी आणि फायदेशीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो देशभरात राबवण्यासाठी मोठी आव्हाने आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ गॅस तयार करणे पुरेसे नसते, तर ग्रामीण भागातून दररोज मोठ्या प्रमाणावर शेण गोळा करणे, ते प्लांटपर्यंत वाहतूक करणे आणि तयार झालेला गॅस पाईपलाईन नसलेल्या भागातून मुख्य बाजारापर्यंत पोहोचवणे अत्यंत खर्चिक आहे. बनासकांठा प्रकल्पाचा सुरुवातीचा पायाभूत खर्च प्रचंड असल्याने, हा प्रकल्प पूर्णपणे नफ्यात येण्यासाठी आणखी किमान 3 वर्षे लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात सध्या केवळ शेणापासूनच नव्हे, तर इंदूरसारख्या शहरांमध्ये ओल्या कचऱ्यापासूनही बायो-सीएनजी बनवून बसेस चालवल्या जात आहेत. 


Topics mentioned in this article