जाहिरात

शेख हसिनांच्या कट्टर विरोधक खालिदा जियांच्या राजकारणाला कशी मिळाली कलाटणी? पुन्हा सत्तेत येणार?

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांची सत्तेवरून हकालपट्टी केल्यानंतर विरोधी पक्षनेत्या खालिदा जिया यांच्यासाठी गोल्डन चान्स असल्याचं मानलं जात आहे.

शेख हसिनांच्या कट्टर विरोधक खालिदा जियांच्या राजकारणाला कशी मिळाली कलाटणी? पुन्हा सत्तेत येणार?
बांगलादेश:

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांची सत्तेवरून हकालपट्टी केल्यानंतर विरोधी पक्षनेत्या खालिदा जिया यांच्यासाठी गोल्डन चान्स असल्याचं मानलं जात आहे. 17 वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या खालिदा काही वर्षांत तुरुंगातून बाहेर येतील असा कोणी विचारही केला नसेल. आता मात्र त्यांचं नशीब बदलण्याची चिन्हं आहेत. चीन-पाकिस्तानच्या समर्थन मानल्या जाणाऱ्या खालिदा जिया यांची लवकरच सुटका होणार आहे. शेख हसिना यांनी पंतप्रधान पदावरून राजीनामा देताच खालिदा यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. बऱ्याच प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.  

खालिदा जिया यांच्या सुटकेच्या आदेशानंतर त्यांना किंवा त्यांच्या पक्षातील काही जणांना बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये सामील केलं जाऊ शकतं. काही वृत्तसंस्थांनुसार, खालिदा जिया यांचे पूत्र आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक रेहमान यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं. 

खालिदा पुन्हा सत्तेत येणार?
बेगम खालिदा जिया या नॅशनलिस्ट पक्षाच्या अध्यक्ष आहेत. हा पक्ष शेख हसिना यांच्या अवामी लीगचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि प्रमुख विरोधी पक्ष आहे. खालिदा यांचा कल जमात-ए-इस्लामच्या दिशेने आहे. खालिदाच्या शासनकाळादरम्यान बांगलादेशात अनेक हिंदू विरोधी आणि ख्रिश्चन विरोधी दंगली झाल्या. खालिदा जिया 1991 मध्ये बांगलादेशाची सत्ता सांभाळत होत्या. 

- खालिदा जिया मार्च 1991-1996 पर्यंत बांगलादेशाच्या पंतप्रधान होत्या. 
- यानंतर जून 2001-2006 या काळात खालिदा पंतप्रधानपदी होत्या. 
- खालिदा बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि मुस्लीम देशांमध्ये बेनिजीर भुट्टोंनंतर दुसऱ्या पंतप्रधान राहिल्या आहेत. 
- खालिदा जिया यांनी 1982 मधील लष्करी उठावानंतर 1990 पर्यंत लोकशाही चळवळीच्या नेतृत्वातही भाग घेतला.

खालिदा जिया बांगलादेशाच्या पंतप्रधान कशा झाल्या?
खालिदा जिया बांगलादेशाचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांच्या पत्नी आहेत. त्यांचे पती जियाउर रहमान यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली होती. 30 मे 1981 मध्ये जियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर 1984 मध्ये त्या बीएनपीच्या अध्यक्षपदी आल्या. 1982 मध्ये तत्कालिन सैन्याचे प्रमुख हुसैन मुहम्मद इरशाद यांच्या नेतृत्वातील सैन्याच्या उठावानंतर खालिदा जिया यांनी लोकशाहीसाठी आंदोलनाचं नेतृत्व करण्यात मदत केली होती. 1991 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला यश मिळालं आणि खालिदा या पंतप्रधान बनल्या. 

खालिदा जिया यांचं राजकारण बदललं...
खालिदा यांनी 1996 मध्ये अल्पकालीन सरकारमध्येही काम केले. 1996 च्या निवडणुकीत शेख हसिना यांची अवामी लीग सत्तेत आली. मात्र खालिदा यांच्या राजकारणाने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला. त्यांचा पक्ष 2001 मध्ये पुन्हा सत्तेत आला. खालिदा यांनी 1991, 1996 आणि 2001 मधील सर्वसाधारण निवडणुकीत पाच वेगवेगळ्या संसदीय मतदारसंघातून विजय मिळवला. 2006 मध्ये त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला. मात्र जानेवारी 2007 मध्ये राजकीय हिंसाचारामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यामुळे कार्यवाहक सरकारवर सैन्यांचं नियंत्रण राहिलं. यादरम्यान खालिदा जिया आणि त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आल्या. करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार, खालिदा झिया यांच्या कार्यकाळात (2001-2005) बांगलादेश हा जगातील सर्वात भ्रष्ट देश होता.

खालिदा जिया यांच्यावर भ्रष्टाचारासह 36 प्रकरणं...
2018 मध्ये खालिदा जियांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात 17 वर्षांची शिक्षा सुनावली होती. अनाथालय ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरण आणि जिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांच्यावर पंतप्रधानपदावर असताना शक्तीचा दुरुपयोग करण्याचा गुन्हा सिद्ध झाला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराची 36 प्रकरणं दाखल आहेत. 2019 मध्ये आरोग्याच्या कारणांमुळे त्यांना तुरुंगात दाखल करण्यात आलं होतं.     


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com