बंगळुरू येथील एआय इंजिनिअरच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. अतुल सुभाष असं आत्महत्ये केलेल्या इंजिनियरचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.अतुलचा भाऊ विकास कुमारच्या तक्रारीवरून मराठहल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अतुलची आत्महत्या करण्यापूर्वीची मानसिक स्थिती कशी होती, याचा अंदाज त्याने लिहिलेल्या सुसाईड नोट आणि व्हिडीओतून लावला जाऊ शकतो. अतुल गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. पत्नीचे एकामागून एक गंभीर आरोप आणि कोर्टाच्या तारखा याला कंटाळून अतुलने टोकाचा निर्णय घेतला. मृत्यूपूर्वी अतुलने 40 पानी सुसाईड नोट लिहिली. त्याच्या मृत्यूपूर्वी दीड तासाचा व्हिडिओ बनवला, ज्याची प्रत्येक ओळ ऐकून अतुलचं दु:ख तुम्हाला कळेल.
कायद्याचा गैरवापर करुन त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा कसा छळ केला हे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. पत्नीने अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दोन वर्षांत 9 खटले दाखल केले होते. 'माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत माझ्या अस्थिकलशाचे विसर्जन करू नये, असं देशील अतुलने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
काय आहे प्रकरण?
अतुल सुभाषचे लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील निकिता सिंघानियाशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक चालले, त्यानंतर निकिता अचानक बंगळुरूहून जौनपूरला परतली • निकिताने तिचा पती अतुल आणि तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. अतुलने व्हिडिओमध्ये सांगितले की त्याची पत्नी आणि सासरच्यांनी पैसे उकळण्याचा मोठा कट रचला.
अतुलने सांगितले की, आतापर्यंत 120 कोर्टाच्या तारखा देण्यात आल्या आहेत आणि अतुल स्वतः बंगळुरूहून जौनपूरला 40 वेळा गेला होता. याशिवाय त्याचे आई-वडील आणि भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. अतुलला एका वर्षात फक्त 23 सुट्ट्या मिळत होत्या. या सर्व प्रकाराला तो कंटाळला होता.
पत्नीने खोटे गुन्हे दाखल केले
अतुलने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, निकिता सिंघानियाने खालच्या न्यायालयात 6 आणि उच्च न्यायालयात 3 खटले दाखल केले आहेत. निकिताने अतुलच्या आई-वडिलांवर आणि भावावर खून, खुनाचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध, घरगुती हिंसाचार, हुंडा घेणे इत्यादी खोटे आरोप केले होते.
पत्नीने एका प्रकरणात आरोप केला की, अतुलच्या कुटुंबाने 10 लाख रुपयांचा हुंडा मागितला. ज्याचा निकिताच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. उलटतपासणीत हे सिद्ध झाले की निकिताच्या वडिलांना हृदयविकार आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृ्त्यूपूर्वी अतुलने त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले की त्याची पत्नी लैंगिक समाधानासाठी विचित्र पद्धतींची मागणी करत असे. अतुलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने घटस्फोटाच्या बदल्यात दरमहा 2 लाख रुपये पोटगीची मागणी केली. तिने मुलाला दूर ठेवले, त्याला कधीही भेटू दिले नाही.
न्यायाधीशही हसले, तारखेसाठी लाच द्यावी लागली
अतुलने जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आरोप केला की, त्याला न्यायालयात तारीख घेण्यासाठी लाच द्यावी लागली. डिसेंबर 2024 मध्ये प्रकरण निकाली काढण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अतुलने केला. अतुलने सांगितले की, जेव्हा त्याने सांगितले की त्याची पत्नी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, तेव्हा न्यायाधीश हसले. अतुलने लाच दिली नाही तेव्हा न्यायालयाने पोटगी आणि देखभालीचे आदेश जारी केले. ज्यामध्ये त्याला दरमहा 80 हजार रुपये द्यावे लागले. अतुलने अखेर न्यायालयात आई-वडिलांना आणि कुटुंबीयांना त्रास देऊ नका असे आवाहन देखील केले होते.
पत्नीसाठी शेवटचा मेसेज
अतुलने पत्नीला देखील आवाहन केलं आहे की माझ्या मुलाला माझ्या पालकांच्या स्वाधीन कर. जेणेकरून त्याचे योग्य संगोपन होईल. भावाला देखील सल्ला दिला की पत्नी आणि तिच्या सासऱ्यांना कॅमेराशिवाय भेटू नको. जोपर्यंत त्रास देणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंतच माझ्या अस्थिकलशाचे विसर्जन करू नका. जर न्याय मिळाला नाही तर माझ्या मृत्यूनंतर माझे अस्थिकलश न्यायालयासमोरील गटारात फेकून दे, असा संताप देखील अतुलने व्यक्त केला.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |