कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथील उल्लाल परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. मृत दाम्पत्याचे लग्न सप्टेंबर 2022 मध्ये झाले होते आणि त्यांना कोणतेही मूलबाळ नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मंजू (27) ही बंगळूरुमधील एका खासगी रुग्णालयात परिचारिका (नर्स) म्हणून काम करत होती. तिचा पती धर्मशीलम (30) हा नुकताच दुबईहून परतला होता. हे दोघे मंजूचे वडील पेरियास्वामी यांच्यासोबत उल्लाल मेन रोडवरील एका भाड्याच्या घरात राहत होते.
(नक्की वाचा- Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...)
घरात आढळले मृतदेह
मृत मंजूचे वडील पेरियास्वामी यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री सुमारे 9.30 वाजता त्यांना घरात दोन्ही मृतदेह आढळले. मंजूचा मृतदेह पलंगावर पडलेला होता आणि तिच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. तर, तिचा पती धर्मशीलम याने नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. पेरियास्वामी यांच्या तक्रारीनंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
ज्ञानभारती पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी हत्या आणि आत्महत्या असा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना का घडली, यामागील नेमके उद्देश काय होता, याचा पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांवरून वाद झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, ठोस कारण शोधण्यासाठी तपासणी सुरू आहे.