Bengaluru Tragic Incident : रक्ताने माखलेल्या अवस्थेत एक महिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर हात जोडून विनवणी करत होती, पण शेकडो लोक समोरून निघून गेले मात्र मदतीला कुणीही धावून आले नाही. वेळेवर उपचार आणि मदत न मिळाल्याने अखेर 34 वर्षीय व्यंकटरमणन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या शहरात हजारो लोक मदतीसाठी पुढे येतील अशी अपेक्षा होती, तिथेच एका हतबल पत्नीला केवळ उपेक्षा आणि अनास्था पाहावी लागली.बेंगळुरुमधील या घटनेने माणुसकी पूर्णपणे संपली आहे की काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.
उपचारांसाठी वणवण आणि नियतीचा घाला
व्यंकटरमणन हे बालाजी नगरचे रहिवासी असून ते मेकॅनिक म्हणून काम करत होते. पहाटे 3:30 च्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांची पत्नी त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यासाठी बाहेर पडली. मात्र, त्यांचे दुर्दैव असे की पहिल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ट्यूटीवर नव्हते.
तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी धाव घेतली. तिथे त्यांना स्ट्रोक आल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णवाहिकेसाठी अनेक फोन केले, पण तिथूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
( नक्की वाचा : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग )
मदतीसाठी आक्रोश पण....
दोन हॉस्पिटलनं नाकारल्यानंतर पुढे जात असतानाच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. व्यंकटरमणन रस्त्यावर वेदनेने विव्हळत पडले होते आणि त्यांची पत्नी रक्ताने माखलेल्या अवस्थेत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडे मदतीची याचना करत होती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही हृदयद्रावक दृश्ये कैद झाली आहेत, ज्यात ती महिला प्रत्येक वाहनासमोर हात जोडताना दिसते, पण एकही वाहन थांबले नाही. अनेक मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एका कॅब ड्रायव्हरने माणुसकी दाखवत त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दुःखातही जपले भान
व्यंकटरमणन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई आणि 5 वर्षांचा मुलगा तसेच 18 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. ज्या मुलाने जगाचा निरोप घेतला, त्याच्या आईकडे बोलण्यासाठी शब्दही उरलेले नाहीत. सरकारी यंत्रणेने आरोग्य आणीबाणीच्या काळात संवेदनशील असायला हवे, अशी भावना त्यांच्या सासूबाईंनी व्यक्त केली आहे.
मात्र, इतक्या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाही या कुटुंबाने माणुसकी जपली आहे. त्यांनी व्यंकटरमणन यांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांच्या मृत्यूमुळे कोणा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world