बंगळुरू महानगरपालिकेने म्हणजेच बी बी एम पीने (BBMP) भटक्या कुत्र्यांसाठी एक योजना हाती घेतली आहे. सुमारे 2.9 कोटी रुपये खर्च करून या भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन राईस खाऊ घालण्यात येणार आहे. कुत्र्यांमधील आक्रमकता कमी करणे आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचे बंगळुरू महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, करदात्यांच्या पैशातून कुत्र्यांसाठी इतका खर्च करण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
( नक्की वाचा: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर )
किती कुत्र्यांना चिकन राईस खाऊ घालणार ?
सुरुवातीला शहराच्या आठ झोनमधील 5,000 भटक्या कुत्र्यांना या योजनेअंतर्गत रोज एक वेळ चिकन राईस खाऊ घातला जाईल. एका कुत्र्याला अंदाजे 367 ग्रॅम भात दिला जाईल. एका कुत्र्याला रोजच्या पोषणासाठी किती गरज आहे याचा अभ्यास करून हे प्रमाण ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एका कुत्र्यामागे 22.42 रुपये खर्च अपेक्षित आहे. 150 ग्रॅम चिकन, 100 ग्रॅम तांदूळ, 100 ग्रॅम भाज्या, 10 ग्रॅम तेल वापरून कुत्र्यांसाठी हा भात तयार केला जाणार आहे
( नक्की वाचा: पाळीव कुत्र्यानं सोसायटीमधील महिलेवर केला हल्ला, 10 फुट उंच कठड्यावरुन खाली कोसळली, पाहा Video )
कुत्र्यांच्या चिकन राईससाठी केंद्रे स्थापन होणार ?
बंगळुरूमध्ये अंदाजे 2.8 लाख भटके कुत्रे आहेत. बंगळुरू महापालिकेने कुत्र्यांना चिकन राईस खाऊ घालण्यासाठी काही विक्रेते निश्चित केले आहेत. हे विक्रेते प्रत्येक झोनमध्ये 400 ते 500 कुत्र्यांसाठी चिकन राईस तयार करून देतील. बंगळुरूतील 100 ते 125 केंद्रांद्वारे कुत्र्यांना खाऊ घातले जाईल. पशुसंवर्धन आयुक्त सुरलकर विकास किशोर यांनी कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठीच्या केंद्रांची स्वच्छता काटेकोरपणे पाळली जावी असे निर्देश दिले आहेत. एखाद्या महापालिकेने भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्राणीप्रेमी खूश, बाकी नागरीक संतप्त
बंगळुरू महापालिकेच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अर्थातच प्राणीप्रेमी जनतेने, खासकरून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांनी या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. याऊलट ही जनतेकडून कररुपाने गोळा केलेल्या पैशांची उधळपट्टी असल्याने काही नागरिकांनी आणि संस्थांनी म्हटले आहे. कुत्र्यांना फुकट खायला घालण्याऐवजी या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या नसबंदीसाठी अधिक प्रयत्न करावे अशी काही नागरिकांनी मागणी केली आहे.
( नक्की वाचा: भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 10 जणांचे लचके तोडले, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण )