ओला इलेक्ट्रिल स्कूटरच्या अनेक ग्राहकांना मोठ्या मनस्तापाचा सामना गेल्या काही दिवसांपासून करावा लागत आहे. अनेक ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी आहेत. मात्र ओलाच्या या ग्राहकांना चांगली सर्व्हिस मिळत नाहीयेत. ओला शोरुम, सर्व्हिस सेंटर बाहेर अनेक ओला स्कूटर धूळखात पडल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यावरुनच प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा आणि ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यात 'ट्विटर वॉर' छेडलं आहे.
कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वादावादी सुरू आहे. कुणाल कामराने अलिकडेच OLA ई-बाईकच्या सर्व्हिस सेंटरचा एक फोटो शेअर केला आहे. जिथे अनेक बाईक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात उभ्या होत्या. कुणाल कामराने ओलाच्या सर्व्हिसवर यावरुन प्रश्न उपस्थित केला होता. यावरुन ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी कुणालला प्रत्युत्तर दिलं. "आमच्यासाठी काम करा, तुमच्या अयशस्वी कॉमेडी करिअरपेक्षा आम्ही तुम्हाला जास्त पैसे देऊ", असा टोलाही भाविश अग्रवाल यांनी कुणालला लगावला होता.
(नक्की वाचा - Inspirational Story : सायकलही चालवता येत नव्हती, आता बनली कॅब ड्रायव्हर; परिस्थितीने सगळं शिकवलं)
कुणाल कामराने रविवारी सकाळी OLA ई-बाईक सर्व्हिस सेंटरच्या फोटोवर नितीन गडकरींना टॅग करत लिहिले की, "भारतीय ग्राहकांकडे आवाज नाही का?, दुचाकी रोजंदारी करणाऱ्या अनेकांची लाईफलाईन आहे. अशी वाहने या भारतीयांना मिळणार का?"
कुणाल कामराच्या ट्विटला उत्तर देताना भाविश अग्रवाल यांनी लिहिले की, "कुणाल कामरा, जर तुम्हाला इतकी काळजी असेल तर आमच्यासाठी काम करा. या पेड ट्वीट आणि तुमच्या अयशस्वी कॉमेडी करिअरपेक्षा मी तुम्हाला जास्त पैसे देईन.नाहीतर गप बसा. आम्हाला ग्राहकांच्या समस्या सोडवू द्या."
भाविश यांच्या करिअरबाबत केलेल्या ट्वीटनंतर कुणाल कामराने पुन्हा ट्वीट केलं. कुणालने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "मला माझ्या अयशस्वी कॉमेडी करिअरची ही क्लिप दाखवायची आहे जिथे मी ग्रोव्हरसाठी शो ओपन करुन प्रेक्षकांना चकित केले. आणखी काही मतलबी, उद्धट, भाविश?"
भाविश अग्रवाल देखील थांबले नाहीत. त्यांनी कुणालच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, "त्रास झाला ना? दुखलं ना? सर्व्हिस सेंटरमध्ये ये खूप काम आहे. तुझ्या फ्लॉप शोमधून जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन."
(नक्की वाचा- वयाची 80 पार, तरही कामगिरी दमदार! जयंती काळे आजी तुम्हाला माहित आहेत का?)
कुणालने याला उत्तर देताना म्हटलं की, "त्याऐवजी तुम्ही त्या लोकांचे संपूर्ण पैसे परत करा, ज्यांनी गेल्या 4 महिन्यांत OLA ई-बाईक खरेदी केल्या आहेत. मला तुमच्या पैशांची गरज नाही. ज्यांनी OLA बाईक खरेदी केली आहे त्यांना तुम्ही पैसे परत देऊ शकत नाही. पण तुम्ही मला पैसे देऊ शकता, जो तुमचा ग्राहकही नाही."
यावर भाविशने लिहिले आहे की, "कॉमेडियन बनू शकला नाही, चौधरी व्हायला निघाला. पुढच्या वेळी चांगले रिसर्च करा. सर्व्हिस सेंटरवर येऊन मदत करण्याची ऑफर खुली असेल. आव्हान स्वीकारा. कदाचित तु्म्ही चांगली स्कील शिकाल."