बिकट परिस्थितीवर मात करुन समाजासाठी प्रेरणा बनणारे अनेक व्यक्तिमक्त आपल्या आजूबाजूला असतात. मात्र अनेकजण सर्वांसमोर येतातच असे नाही. अशीच एक कॅब ड्रायव्हर महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका प्रवाशाने या महिलेचा खडतर प्रवास सोशल मीडियावर मांडला आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात ही महिला कॅब चालवते. मात्र तिची कॅब चालक बनण्याची गोष्ट ऐकून प्रवासी ओजस देसाई देखील थक्क झाले.
ओजस देसाई यांनी आपला अनुभव फेसबूक पोस्टद्वारे सर्वांसमोर मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "अहमदाबाद रेल्वे स्टेशनसाठी मी ओला कॅब बूक केली होती. कन्फर्मेशन नोटिफिकेशनमध्ये ड्रायव्हरचं नाव अर्चना पाटील आलं. महिला ड्रायव्हर असल्याने माझ्या डोक्यात देखील अनेक विचार आले. एका महिलेने ओला कॅब चालवणे एवढी मोठी गोष्ट नाही. मात्र अर्चना ज्या पद्धतीने गाडी चालवत होत्या ते पाहून मला देखील आनंद झाला."
ओजस यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, "अहमदाबाद शहरातून रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रॅफिकमधून गाडी चालवणे एक आव्हानच आहे. मी यामुळे खूपच प्रभावित झालो. एखादी महिला ओला ड्रायव्हरसोबत प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. महिला असून तिचं गाडी चालवणं नाही तर त्यामागची तिची कहानी खास होती."
सहा महिन्यात गाडी शिकून बनली ड्रायव्हर
"अर्चनाचे पती देखील कॅब ड्रायव्हर होते. मात्र आजारापणामुळे त्यांना गाडी चालवणे शक्य होत नव्हतं. मात्र त्यांनी घेतलेल्या गाडीवर बँकेचं लोन सुरु होतं. ते फेडणे देखील महत्त्वाचं होते. त्यामुळे यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अर्चना यांनी अवघ्या 6 महिन्यात गाडी शिकून लायसन्स देखील मिळवलं. विशेष म्हणजे अर्चना यांना याआधी सायकल देखील चालवता येत नव्हती. मी आज एका उत्साही व्यक्तीला भेटलो. खराब परिस्थितीत हार न मानता त्यांनी हिमतीने परिस्थितीचा सामना केला", असं ओजस यांनी म्हटलं. ओजस यांची पोस्ट व्हायरल झाली असून हजारो लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world