'जाको राखे साइयां मार सके ना कोय' ही म्हण बिहारमधील भागलपूर येथे खरी ठरली. मुंगेरच्या बरियारपूर येथील रहिवासी कुमकुम देवी सुलतानगंज येथील नमा मी गंगे घाटावर गंगास्नान करत होत्या. तेव्हा त्या गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. त्यांची वाचण्याची आशा संपली होती. तेव्हा गंगेच्या मधोमध त्यांना एक प्रेत तरंगताना दिसले. कुमकुम देवी यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी त्या प्रेतालाच आपला आधार बनवला. सात किलोमीटरपर्यंत त्या त्याच प्रेताला धरून वाहत गेल्या. त्यामुळे त्यांचा जीव मात्र वाचला.
कुटुंबीय मृत झाल्याचा शोक करत होते
अखेरीस, तिलकपूर गावाजवळ एका नावाड्याची नजर त्यांच्यावर पडली. त्याने लगेच कुमकुम देवी यांना वाचवले. त्या नावेत बसवून किनाऱ्यावर आणले. याआधीच, कुमकुम देवी यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. पण जेव्हा त्यांनी कुमकुम देवी यांना जिवंत पाहिले, तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ही घटना म्हणजे जर देवाची साथ असेल, तर कोणतीही अडचण पार करता येते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सोबतची महिला बुडाली, नंतर त्याच प्रेताला धरून वाचली
या अपघातातून वाचलेल्या कुमकुम देवींनी सांगितले की त्या गयाहून आलेल्या एका महिलेसोबत गंगास्नानासाठी गेल्या होत्या. दोन्ही महिला गंगेत आंघोळ करत असताना जोरदार प्रवाहात सापडून बुडू लागल्या. त्यांच्यासोबतची महिला बुडून गेली. पण कुमकुम देवीं यांनी धीर सोडला नाही. मग कुमकुम त्याच महिलेच्या प्रेताला धरून मदतीसाठी ओरडत गंगेच्या प्रवाहातून वाहत गेल्या.
7 किमी दूर नावाडयाच्या मदतीने वाचले प्राण
7 किलोमीटर दूर एका नावाडयाच्या मदतीने त्या गंगेच्या जोरदार प्रवाहातून बाहेर येऊ शकल्या. महिलेला जिवंत पाहून आजूबाजूचे लोक याला देवाचा चमत्कार मानत आहेत. सध्या गंगा दुथडी भरून वाहत आहे. स्थिती अशी आहे की गंगेचे पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहत आहे आणि सखल भागातील गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.