Nitish Kumar News: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थान राहिलेले नीतीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण राज्यसभेवर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात आता सत्तेचे नवे समीकरण आकारास येत आहे.
भाजपचा पहिला मुख्यमंत्री
हिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे एकमेव असे राज्य होते जिथे अद्याप भाजपचा मुख्यमंत्री झाला नव्हता. नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. एनडीएच्या सूत्रानुसार, आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल, तर जेडीयूच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नीतीश कुमार यांनी सन्मानाने पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
निशांत कुमार यांची सक्रिय राजकारणात एन्ट्री
नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आता बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात प्रवेश करतील. त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे समजते. जेडीयू कोठ्यातून दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विजय चौधरी आणि अशोक चौधरी (दलित चेहरा) यांची नावेही चर्चेत आहेत.
जेडीयूमध्ये नाराजीचे सूर?
नीतीश कुमार यांच्या या निर्णयामुळे जेडीयूच्या गोटात काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. आमदार दलाची बैठक न घेता इतका मोठा निर्णय घेतल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. अशा महत्त्वाच्या निर्णयावर विधिमंडळ पक्षात चर्चा होणे गरजेचे होते, असे काही आमदारांचे मत आहे. लवकरच या संदर्भात आमदार दलाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)
राज्यसभा निवडणुकीचे गणित
बिहारमधून राज्यसभेच्या 5 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून गुरुवारी (आज) नामांकनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नीतीश कुमार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.