मानसी पिंगळे, प्रतिनिधी
Haryana New CM : हरियाणामध्ये सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंंत्री होणार आहे. या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकवले. राज्यात 90 पैकी 48 जागा जिंकल्या. हरियणातील मतदारांनी सलग तीन विधानसभा निवडणुकीमध्ये एकाच पक्षाला कौल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर हरियणातील हा विजय भाजपाची महत्त्वाचा आहे. या विजयामुळे देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं आहे. या ऐतिहसिक विजयानंतरही हरियाणा भाजपामध्ये सर्व काही आलबेल नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपानं घेतलेल्या एका निर्णयामुळे याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शाहांवर वेळ का?
हरियणामधील नवनिर्वाचित आमदारांची बैठक 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पक्षाच्या प्रथेप्रमाणे या बैठकीसाठी दोन केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामधील एक निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहे. अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना निरीक्षक म्हणून पक्षानं नियुक्त केलं आहे.
भाजपानं हरियाणा विधानसभा निवडणूक नायब सिंह सैनी यांच्या चेहऱ्यावर लढली. स्वत: अमित शाह यांनी याबाबतची घोषणा पंचकुलामधील एका सभेत केली होती. त्यानंतर सैनी पुन्हा मुख्यमंत्री होणार असं मानलं जात होतं. अमित शाह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठवण्याची वेळ भाजपावर का आली? हे पाहूया
( नक्की वाचा : 'महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही', काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना 3 विषयांवर वॉर्निंग )
मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपाचे अनेक नेते मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. त्यामधील दोन नेते वरिष्ठ आहेत. ते पक्षातील वरिष्ठतेच्य़ा आधारावर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा करत आहेत. अंबालामधील सातव्यांदा आमदार बनलेले माजी मंत्री अनिल विज आणि केंद्रीय मंत्री इंद्रजीत सिंह मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये उतरले आहेत. या दोघांनीही जाहीरपणे दावा सादर केला आहे. त्यामुळे नायब सैनी तसंच केंद्रीय नेतृत्त्वासमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
भाजपा आमदारांची बैठकीत गोंधळ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत सैनी यांच्या नावाला विरोध केला जाऊ शकतो. सैनी यांची निवड शांततेत व्हावी यासाठी अमित शाह या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हरियणा भाजपातील ज्येष्ठ नेते अनिल विज सैनी यांच्या नावाला विरोध करु शकतात, ही भाजपाला भीती आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री इंद्रजित सिंह यांनीही 'लोकांची इच्छा' हे कारण देत नवं आव्हान उभं केलं आहे.
( नक्की वाचा : मोदींच्या स्वप्नाचा शिल्पकार, हरियाणात केला चमत्कार! मिस्टर डिपेंडेबल होणार भाजपाचा अध्यक्ष? )
मुख्यमंत्री पदाचे दावेदार पाहून त्यांना संतुष्ट करण्यासाठी अमित शाह सारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपानं केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांना संतुष्ट करणे तसंच मंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्या नेत्यांना खुश करणे हे भाजपासमोरचं मोठं आव्हान आहे. हरियणात सध्या भाजपाचे अनेक गट सक्रीय आहेत. प्रत्येक गट त्यांना अधिक मंत्रिपद मिळावीत यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.