BJP MLA Hiraan Chatterjee Second Marriage : पश्चिम बंगालमधील भाजपा आमदार आणि प्रसिद्ध अभिनेते हिरन चॅटर्जी सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या वादात सापडले आहेत. चटर्जी यांनी दुसरं लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे.या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीनं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हिरन यांनी वाराणसीमध्ये मॉडेल रितिका गिरीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला असला तरी, हे लग्न कायदेशीर रित्या अवैध असल्याचा दावा करण्यात येत आहे.
वाराणसीत गुपचूप झालं लग्न
गेल्या काही काळापासून हिरन चॅटर्जी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांपासून थोडे लांब आहेत. याच काळात त्यांनी कोलकाता सोडून थेट वाराणसीमध्ये जाऊन हिंदू रितीरिवाजाप्रमाणे रितिका गिरीसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो समोर आल्यावर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. लाल बनारसी साडीतील नवरी आणि पिवळ्या कुर्त्यातील हिरन अशा या जोडीचे फोटो स्वतः हिरन यांनी फेसबुकवर पोस्ट केले होते, मात्र काही वेळातच त्यांनी ती पोस्ट डिलीट केल्याने संशय आणखी वाढला.
पहिल्या पत्नीचा संताप आणि गंभीर आरोप
हिरन यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याची पहिली पत्नी अनिंदिता चॅटर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. अनिंदिता यांनी सांगितलं की, हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. आमचे लग्न 11 डिसेंबर 2000 रोजी झाले होते आणि आम्हाला 19 वर्षांची एक मुलगी आहे.
( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )
घटस्फोट न घेता केलेले हे दुसरे लग्न कायद्याला धरून नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. अनिंदिताने असेही म्हटले आहे की, ती गेल्या अनेक वर्षांपासून हिरन यांचा त्रास सहन करत होती, पण केवळ मुलीच्या भविष्यासाठी त्या आजवर गप्प राहिली होती.
मुलीच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम
या सर्व वादाचा सर्वाधिक फटका हिरनच्या 19 वर्षांच्या मुलीला बसला आहे. अनिंदिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या या वागण्यामुळे त्यांची मुलगी सध्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. जेव्हा एक बाप आपल्या मुलाची जबाबदारी झटकतो, तेव्हा त्याचा परिणाम मुलाच्या संपूर्ण आयुष्यावर होतो, अशा शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केले. हिरन गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या मुलीपासून लांब राहत असून ते बहुतेक वेळ खडकपूरमध्येच घालवत होते.
कौटुंबिक वादाला नवीन वळण
अनिंदिता यांनी आरोप केला आहे की, हिरन यांची दुसरी पत्नीच हे कुटुंब तुटण्यास कारणीभूत ठरली आहे. अभिनेते ते नेते असा प्रवास करणाऱ्या हिरन यांनी अद्याप या सर्व आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रियेविना दुसरे लग्न केल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. आता हिरन यावर काय स्पष्टीकरण देणार आणि हा वाद कायदेशीर रित्या कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.